यंदा कोण गाजवणार मुंबई महानगरपालिका निवडणूक … ठाकरे की फडणवीस

मुंबई, २० ऑगस्ट २०२२: मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. पण सध्याच्या राजकारणामुळे आता हा बालेकिल्ला ठाकरेंकडे राहणार की नाही, हा प्रश्न नक्कीच सगळ्यांना पडला आहे. ठाकरे विरुद्ध शिंदे गट आणि फडणवीस असे युद्ध सुरु आहे. त्यातही आता उरलेल्या शिवसेनेतले सदस्यदेखील हळू हळू शिंदे गटाकडे सरकायला लागले आहेत. हेच चित्र सध्या दिसत आहे. त्यामुळे शिवसेनेला मुंबई महानगर पालिकेवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

मुंबई महापालिका निवडणुकांची तारीख लवकरच जाहीर होईल. त्याच्या प्रचाराला आज भाजप सुरुवात करत आहे. ज्यात भाजप आता कुठली नीती आखणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात पन्नास खोके, एकदम ओके अशा घोषणा देत विरोधकांनी नुकताच शिंदे गटावर हल्ला बोल केला होता. ही रणनीती भाजपनी शिवसेना फोडायला अवलंबली असं जर मानलं, तर महापालिका निवडणुकीत भाजप काय रणनीती खेळेल, हे पहाणं शिवसेनेला फार गरजेचं आहे.

दुसरीकडे आज भाजपने मुंबईमध्ये षण्मुखानंद हॉलमध्ये मेळावा आयोजित केला. ज्यात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराचा नारळ फोडला आहे. यावेळी आशिष शेलार, देवेंद्र फडणवीस यांचा पगडी घालून सत्कार करण्यात आला. त्यांचेही लक्ष मुंबई महापालिकेवरच आहे.

यावेळी भाजपच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांनी सुरवातीलाच उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. आता मुख्यमंत्रीही घरी बसणार नाहीत. तसेच ते तुम्हालाही घरी बसू देणार नाहीत, असं म्हणत उद्धव ठाकरेंच्या वर्मावर बोट ठेवलं. भाजप एकही दिवस शांत बसला नाही आणि बसणार नाही, असं म्हणत त्यांनी भाजपचं शक्तीप्रदर्शन दाखवून दिलं. आता महानगरपालिकेवर जो भगवा फडकेल, तो हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिंदे गटाच्या शिवसेनेचा भगवा असेल, असेही फडणवीस यांनी यावेळी नमूद केलं.

मुंबईत “विकास लीग” सुरु करायची आहे. आणि आशिष शेलार हे पालिकेचा सामना जिंकतील असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. येत्या तीन महिन्यात धारावीतल्या लोकांच्या अडचणी नष्ट करुन धारावीतल्या लोकांना त्यांच्या स्वप्नातलं घर द्यायचं आहे, असं फडणवीस यांनी सांगितलं. धारावीच्या झोपडपट्टीतल्या लोकांसाठी आशिष शेलार नक्कीच सक्षम आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. आम्ही मराठीची सेवा करणारी लोकं आहोत, त्यामुळे आशिष शेलार हे मराठी माणसासाठी कायम लढतील आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करतील असा विश्वास फडणवीस यांनी दिला आहे.

यावरुन आता भाजप, शिंदे गट विरुद्ध ठाकरेंची शिवसेना यांच्यात रणशिंग फुंकले गेले आहे, हे मात्र खरं.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा