मुंबई, १५ सप्टेंबर २०२०: सुशांत मृत्यू प्रकरणानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलं तापलेलं दिसत आहे. आत्महत्येच्या चौकशी पासून सुरू झालेलं हे प्रकरण अनेक वळणं घेत अनेक व्यक्तींशी जोडलं गेलं. आता यावरून राजकारण देखील होताना दिसतय. अलीकडंच कंगना आणि राज्य सरकार यांच्यात यावरून हेवेदावे होताना दिसले. या आधी भाजपनं या प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी उचलून धरली होती, याला अनुसरून शिवसेनेचे प्रवक्ते आणि पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर गोपीनाथ मुंडे विषयी प्रश्न केलाय. “भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करावी, असे भाजपला का वाटलं नाही? असा प्रश्न त्यांनी केलाय.
यासह त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका केली. ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंच्या रुपात उत्तर महाराष्ट्रातील ओबीसी नेता संपवला, असा घणाघातही त्यांनी केला. अजिंठा शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना गुलाबराव पाटील यांनी ही विधानं केली. भाजप सरकार सातत्यानं ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबई पोलिसांकडून सुशांत प्रकरणाची चौकशी सीबीआयकडं वर्ग करण्याची मागणी देखील भाजपनं लावली होती. ठाकरे सरकार या प्रकरणाच्या चौकशीत दिरंगाई करत आहे असा आरोप भाजपनं केला होता.
दरम्यान, दिल्लीत ३ जून २०१४ रोजी गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झालं. मात्र, ईव्हीएम हॅकिंगच्या माहितीमुळे भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाल्याचा दावा अमेरिकन सायबर एक्स्पर्टनं गेल्या वर्षी केला होता. या दाव्यामुळं देशभरात एकच खळबळ उडाली होती.
फडणवीसांवर टीका/खडसेंना आव्हान
“एकनाथ खडसे यांच्यासारख्या मातब्बर ओबीसी नेत्यांना संपवण्याचं कारस्थान माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षानं रचलं आहे. मात्र, एकनाथ खडसे आणि फडणवीस यांच्यातील युद्ध असंच चालतं, बंद पडतं. खडसे आरोप करतात आणि गप्प बसतात, असं व्हायला नको. नाथाभाऊ आता पक्की कुस्ती खेळा” असं आवाहन गुलाबराव पाटील यांनी केलं.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे