नवी दिल्ली, दि. ३० जुलै २०२०: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने १४ जूनला मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यांनतर देशभर गाजलेल्या या प्रकरणानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले. काहींनी सुशांतला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याच्या आरोप केला तर कंगना रानौतने बॉलिवूडमधील भेदभाव याला जबाबदार असल्याचा थेट आरोप केला. मात्र आता या प्रकरणाला राजकीय वळण येत आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी सुशांत सिंग राजपूतची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे. आज याबद्दल ट्विट करत ते म्हणाले की, मला असं का वाटतंय की सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली आहे? या ट्विट सोबतच त्यांनी एक दस्ताऐवज शेअर केला आहे. त्यामुळे आता याला राजकीय वळण लागले आहे. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास सध्या मुंबई पोलीस करत आहेत.
अनेकांनी हा तपास सीबीआय कडे देण्यात यावा अशी मागणी केली आहे. मात्र या प्रकरणाला सीबीआय चौकशीची गरज नसल्याचं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. दरम्यान सुशांतच्या वडिलांनी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्यावर सुशांतच्या मृत्युसाठी जबाबदार असल्याचा आरोप करत पाटणा येथे तक्रार नोंदवली आहे.
या प्रकरणावर बॉलिवुडमधील अनेकांची चौकशी मुंबई पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्यातच अनेक नेत्यांच्या विधानांमुळे या प्रकरणाला राजकीय वळण लागत असल्याचं दिसतंय.
न्यूज अनकट प्रतिनिधी