सनी देओलला जो न्याय लावला, तो नितीन देसाईंना का नाही? संजय राऊतांचा केंद्र सरकारला सवाल

मुंबई, २७ ऑगस्ट २०२३ : सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. आत्महत्येपूर्वी थकीत कर्जाच्या बाबतीत काही मदत मिळावी म्हणून नितीन देसाई दिल्लीत जाऊन भाजप नेत्यांना भेटले होते. पण त्यांना कोणतीही मदत मिळाली नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच बॉलिवूड अभिनेता भाजप खासदार सनी देओल जो न्याय लावला तो न्याय कला दिग्दर्शक नितीन देसाईंना का नाही, असा सवाल संजय राऊत यांनी क्रेंद्र सरकारला विचारला आहे.

संजय राऊत म्हणाले, सनी देओल भाजपचे खासदार आहेत. त्यांनी ६०-७० कोटी कर्ज घेतलं होतं. ते कर्ज ते फेडू शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या बंगल्याचा लिलाव पुकारला. बँकेने त्यासंदर्भात नोटीस काढली, ऑक्शन पुकारलं. पण २४ तासात दिल्लीतून काही सूत्र हल्ली आणि लिलाव थांबवला गेला. सनी देओल आणि त्यांच्या बंगल्याला वाचवण्यात आलं मग हाच न्याय नितीन देसाई यांना का देण्यात आला नाही. संजय राऊत पुढे म्हणाले, आत्महत्येपूर्वी नितीन देसाईंनी भाजप नेत्यांकडे मदतीसाठी धाव घेतली होती. त्यांनी अनेकांचे दरवाजे ठोठावले. मात्र, त्यांना न्याय मिळाला नाही. दुसरीकडे, सनी देओलवरही मोठे कर्ज होते. त्यांच्या घराचा लिलाव करण्यासाठी बँक ऑफ बरोडाने त्यांना नोटीस पाठवली होती. मात्र, ते भाजपचे खासदार तसेच भाजपचे स्टार प्रचारक असल्यामुळे बँकेने दुसऱ्याच दिवशी त्यांची नोटीस मागे घेतली. नितीन देसाई भाजपचे कोणी नव्हते, म्हणून त्यांची मदत केली नाही का? असा सवाल करत याच गोष्टीने त्यांचा जीव घेतल्याचे संजय राऊत म्हणाले.

एका बाजूला देशातून हजारो कोटी रूपये घेऊन अनेकजण बँकांना बुडवून पळत आहेत. जे भाजपसोबत आहेत, त्यांची कर्ज माफ होत आहेत आणि कारवाई होत नाही. दुसऱ्या बाजुला एक हरहुन्नरी मराठी माणूस ‘शे दीडशे’ कोटींचे रूपयाचे कर्ज आपण फेडू शकलो नाही म्हणुन आत्महत्या करतो. त्यांनी जे स्वप्न एन डी स्टुडिओच्या माध्यमातून उभे केले होते, ही अतिशय खेदाची बाब आहे. असा घणाघाती आरोप राऊत यांनी या वेळी केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा