शिंदे गट वेगळा का झाला, दसरा मेळाव्याला मिळेल याचं उत्तर; रामदास कदमांचं विधान

मुंबई, २९ सप्टेंबर २०२२ : शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यासाठी यंदाचा दसरा मेळावा महत्त्वाचा आहे. त्यामुळे मुंबईत येण्याचं आवाहन दोन्ही गटाकडून राज्यातून कार्यकर्त्यांना करण्यात आलं आहे. ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा करण्याची परवानगी उच्च न्यायालयात मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे बीकेसी येथील मैदानावर मेळावा घेण्यासाठी शिंदे देखील जोरदार तयारी करत असल्याची माहिती आहे.

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आज शिंदे गटातील नेत्यांची मुंबईत महत्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. तर बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा सोनं लुटणारा दिवस म्हणजे दसरा मेळावा हा स्वर्गीय आहे. या मेळाव्याचे आकर्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार आहेत, असं दीपक केसरकरांनी सांगितलं. तसेच सगळी उत्तरं दसरा मेळाव्यात समजतील. मेळाव्याला मोठ्या प्रमाणात लोक येणार आहेत. शिंदे गट का वेगळा झाला याचं उत्तरही दसरा मेळाव्यात मिळेल, असं शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी म्हटलं आहे.

शिंदे गटातील सर्व आमदारांना आपल्या मतदारसंघातून मोठया प्रमाणात सभेसाठी कार्यकर्त्यांना घेऊन येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपल्या मतदारसंघासाठी ३०० एसटी बुक एकट्या अब्दुल सत्तार यांनी केल्याची माहिती आहे. तर शिंदे गटातील आमदारांकडून जवळपास ४ हजार ५०० गाड्यांची मागणी महामंडळाकडे केल्याची माहिती आहे. तसेच बीकेसी इथे शिंदे गट हे पाच लाख लोकांना आण्याचा प्रयत्न करत आहे.

शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी दीड लाखांपर्यंत शिवसैनिकांची गर्दी जमण्याची योजना आखण्यात आली आहे. विविध जिल्ह्यांमधून शिवसैनिक शिवतीर्थावर पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुखांवर सोपवण्यात आली आहे. तर शिवसैनिकांच्या स्वागताची जबाबदारी मुंबईतील शिवसेनेच्या शाखाप्रमुखांना देण्यात आली आहे. न भूतो न भविष्यति असा दसरा मेळावा भरवा, असा आदेश माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. शिवसैनिकांच्या स्वागतासाठी दादर, माहिम, प्रभादेवी परिसरात विशेष गेट उभारण्यात येणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा