रानमांजर म्हणजेच इंग्रजीत जंगल कॅट नावाने ओळखले जाणारे मांजर, हे पुर्णतः जंगली असते. शेतात, माळरानावर, जंगलात सगळीकडे यांचा वावर असतो. या मांजरांच्या अंगावर पोटाकडे आणि फ़क्त पायावर अस्पष्ट असे पट्टे किंवा कडी असतात. बाकी अंगभर भुरकट राखाडी किंवा पिवळट मातकट रंगाचे केस असलेलें हे मांजर संपुर्ण भारतीय उपखंडात आढळतं.
ही रानमांजरं आपल्या घरातल्या मांजरापेक्षा आकाराने थोडी मोठी असतात. यांचे पाय लांबट सडपातळ असून शेपटी मात्र आखूड असते. या मांजरांचे कान, पाळीव मांजरांपेक्षा मोठ्ठे, उंच आणि उभे असतात. थंडीत ह्या कानांवर केसांचा झुपका येतो.
रानमांजराच वजन दहा ते पंधरा किलोपर्यंत असते. साधारण एक ते दिड फ़ूट वाढणारी ही रानमांजर निशाचर असली तरीही अतिशय बेधडक आणि दिवसापण भक्ष पकडताना नजरेस पडते. खेड्यांमध्ये ही कोंबड्या पळवते. रानमांजरच्या खाण्यात छोटे प्राणी, पक्षी, सरपटणारे जीव भरपूर प्रमाणात असतात. दिवसभर हे मांजर सतत खात असतं.
रानमांजराचं आयुष्य साधारण बारा ते चौदा वर्षे असतं. जानेवारी ते एप्रिल आणि जुन जुलै हा ह्यांच्या प्रजननाचा काळ समजला जातो. साधारण दोन महिन्यांच्या गर्भधारणेनंतर मादी चार पाच पिल्लांना जन्म देते. इतर मांजरा प्रमाणेच ह्यांची पिल्लंसुद्धा जन्माला आल्यावर आंधळीच असतात. साधारण १० ते १५ दिवसानंतर यांचे डोळे उघडतात. तिसऱ्या महिन्यापासून ही पिल्लं आईच्या दुधाव्यतिरीक्त बाहेरचे खाणे सुरु करतात. काही महिन्यानंतर ही पिल्लं स्वतंत्र होतात. रानमांजरं वर्षातून दोनवेळा पिल्लं देतात.
जंगलात साळींदराने सोडून दिलेली बिळं किंवा झाडाच्या ढोल्यांमधे अथवा जमिनीत खड्डा करून मादी पिल्लांना जन्म देते. बहुतेकदा मादी एकटीच पिल्लांच रक्षण करते परंतू कधीकधी नर मांजरपण पिल्लांकडे लक्ष देतो. ही रानमांजरं इतर मांजरांसारखीच झाडावर चढण्यात पटाईत असतात. वेळप्रसंगी ही पाण्यात उतरून पोहते. सर्व मार्जार कुलाप्रमाने ह्या मांजरी सुद्धा आपल्या अधिवसाच्या हद्दी ठरवून घेतात.
रानमांजरांना मनुष्यापासून तर धोका आहेच, त्याच जोडीला जंगलात कोल्हे, बिबटे, अस्वलं आणि पाण्याजवळ मगरींचा धोका असतो. कित्येकदा लांडगे आणि वाघांपासूनपण यांना स्वत:च संरक्षण कराव लागतं. हे मांजर चिडलं की समोरच्यावर चक्क उडी मारून हल्ला करतं. त्याआधी अतिशय हलक्या आवाजात गुरुगुरुन ते इशारे देण्याचा प्रयत्न करतं. याचं ओरडणं पाळीव मांजरापेक्षा थोड वेगळं असतं.
रानमांजर आपल्या देशात सगळीकडे पहायला मिळते. संपुर्ण भारतीय उपखंडात हे मांजर आढळून येतं. भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याने ह्या मांजराला संरक्षण दिले आहे. रानमांजर सहसा दृष्टीस पडत नाही, रात्री किंवा दिवसा शेतातून, रानातून जाताना अचानक हे दिसते पण ते चटकन ओळखू येत नाही, आपल्याला ते पाळीव मांजरासारखेच दिसते.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.