वन्यप्राणी- कस्तुरी मृग (Musk deer)

कस्तुरी मृग हे दुर्मिळ असे एक हरीण आहे. दक्षिण व ईशान्य आशिया, काश्मीर, नेपाळ, हिमालयाचा काही भाग व भूतान येथे हा आढळतो. समुद्रसपाटीपासून तीन ते चार हजार मीटर उंचीवरील वृक्षांच्या दाट जंगलात यांचा अधिवास असून त्यांचा वावर मर्यादित क्षेत्रात असतो.कस्तुरी मृग हा सस्तनी वर्गाच्या समखुरी गणातील हरणांच्या मृगकुलातील प्राणी आहे. याचे शास्त्रीय नाव मॉस्कस मॉस्किफेरस आहे.

कस्तुरी मृगाचे सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या नरांमध्ये असलेली कस्तुरी-ग्रंथी. या ग्रंथीपासून कस्तुरी मिळते. तीन वर्षांहून जास्त वयाच्या नराच्या बेंबीजवळ, उदराच्या त्वचेखाली कस्तुरी-ग्रंथी असते. या ग्रंथीतून तपकिरी व मेणासारखा स्राव पाझरतो आणि एका पिशवीत जमा होतो. ताजेपणी त्याला मूत्राप्रमाणे उग्र दुर्गंधी असते, पण तो वाळल्यावर त्याला सुगंध येतो. यालाच कस्तुरी म्हणतात. त्यात मुख्यतः मस्कोन हे कार्बनी संयुग असते. कस्तुरी हे सुगंधी द्रव्य आहे, त्याचा उपयोग अत्तर बनविण्यासाठी होतो. एका नरापासून सरासरी २५ ग्रॅम कस्तुरी मिळते. कस्तुरी मिळविण्याकरिता या हरिणाची हत्या केली जाते. पण त्यांची हत्या न करताही कस्तुरी मिळविता येते. हि प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असून, इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर (आययुसीएन) ही जागतिक संघटना, या प्राण्याच्या संरक्षणासाठी विशेष प्रयत्‍न करीत आहे.

कस्तुरी मृगाची अजुन ठळक वैशिष्ट्ये म्हणजे, याला शिंगे नसतात. नराच्या वरच्या जबड्यात ८-१० सेंमी. लांब वाढलेले सुळे असतात. माद्यांचे सुळे आखूड असल्यामुळे दिसून येत नाहीत. या मृगांचे मागील पाय पुढील पायांपेक्षा अधिक लांब आणि मजबूत असतात. त्यांच्यात पित्ताशय असतो. मादीला फक्त दोन स्तनाग्रे असतात. डोक्यासह शरीराची लांबी तीन फुटापर्यंत असते. छोटेसे शेपूट ४-५ सेंमी.लांब असून केसांमुळे सहजासहजी दिसून येत नाही. खांद्यापाशी उंची एक फुटापर्यंत असते. प्रौढ हरिणाचे वजन ११ ते १८ किलो असते. याचा रंग गडद तपकिरी असून त्यावर करड्या रंगाचे ठिपके असतात. मानेपासून पोटाकडील भाग पांढुरका होत गेलेला असतो. शरीरावर दाट, राठ व लांब केस असल्यामुळे कडाक्याच्या थंडीपासून त्याचे रक्षण होते.

कस्तुरीमृग एक एकटे किंवा जोडीने राहतात. गवत, शेवाळ किंवा झाडांचे कोवळे कोंब हे त्यांचे अन्न आहे. ते मिळविण्यासाठी सकाळी ते संध्याकाळी ते बाहेर पडतात. ज्या परिसरात त्यांचा वावर असतो त्याची हद्द ठरविण्यासाठी त्या परिसराच्या सीमारेषेवर ते मुद्दाम विष्ठा टाकतात तसेच एकाच ठिकाणी दीर्घकाळ ते राहतात. पाठलाग केल्यास हा प्राणी, जेथे शिकारी प्राणी पोहोचू शकणार नाही अशा डोंगरी, खडकाळ सुळक्यांच्या भागात आश्रय घेतो. वाघ, अस्वल व लांडगे अशा शिकारी प्राण्यांपासून त्याला धोका आहे. यांचा विणीचा काळ नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यांत असतो. १६० दिवसांच्या गर्भावधीनंतर मादीला एक किंवा क्वचित् दोन पाडस होते. त्याच्या अंगावर ठिपके असतात. एक वर्षानंतर त्याचे प्रौढात रूपांतर होते.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा