वन्यप्राणी- भेकर (Barking deer)

भेकराचे नाव भेकर हे त्याच्या आवाजावरून पडले आहे. धोक्याची जाणीव झाल्यानंतर तो भुंकल्यासारखा आवाज काढतो, म्हणून त्याला ‘बार्किंग डियर’ किंवा ‘भुंकणारे हरीण’ असेही म्हणतात. जंगलातील शांततेत याच्या भुंकण्याचा आवाज चांगलाच घुमतो व दुरवर ऐकू येतो. भारतात आढळणाऱ्या भेकराचे शास्त्रीय नाव म्युंटिअ‍ॅकस म्युंटजॅक आहे. तो बांगला देश, नेपाळ, श्रीलंका, चीनचा दक्षिण भाग, व्हिएतनाम, जावा, बाली व कंबोडिया येथे आढळून येतो. जगभरात आढळणाऱ्या भेकराच्या १२ जाती आहेत. भेकर मूळचा भारत, आग्नेय आशिया आणि दक्षिण चीनमधील असून त्याच्या काही जाती युरोप मध्ये आहेत.

भेकराच्या शरीराचा रंग गडद तपकिरी किंवा पिवळसर-तपकिरी असून पोटाकडील रंग पांढुरका असतो. पायावरील केसांचा रंग किरमिजी-तांबडा असतो. त्याचा रंग ऋतुमानानुसार बदलतो. अंगावरचे केस मऊ, जाड आणि दाट असतात. भेकर आकाराने लहान असतो. त्याची उंची खांद्याजवळ दोन सव्वादोन फुटापर्यंत तर शरीराची लांबी तीन सव्वातीन फुटापर्यंत असते. आणि वजन २२–२३ किग्रॅ. असते. नर भेकराच्या वरच्या जबड्यातील सुळे लांब असून ते तोंडाबाहेर आलेले दिसतात. शिंगे आखूड असतात. ती कपाळाच्या हाडांना जुडलेली असून दरवर्षी गळून पडतात व पुन्हा वाढतात. भेकराच्या केवळ नरालाच शिंगे असतात.

भेकराचा विणीचा हंगाम वर्षभर असतो. मादी पहिल्या-दुसऱ्या वर्षात प्रजननक्षम होते. सहा-सात महिन्यांच्या गर्भावस्थेनंतर मादी एक किंवा दोन पिलांना जन्म देते. सहा महिन्यांपर्यंत पिले मादीसोबत राहतात. एका कळपात दोन-तीन माद्या, पिले आणि एक नर असतो. भेकर बहुधा एकएकटे राहतात. विणीच्या काळात ते जोडीने किंवा मादी पिलांसोबत वावरताना दिसतात. नर आपल्या क्षेत्राबद्दल अतिशय जागरुक असतात. अधिवासाची सीमा निश्‍चित करण्यासाठी नर भेकर डोळ्याजवळील गंधग्रंथींचा स्राव झाडावर घासतो. स्वत:च्या हद्दीमध्ये एक नर दुसऱ्या नराला घुसू देत नाही. काही वेळा दुसऱ्या कळपातील मादी मिळविण्यासाठी नर आपल्या क्षेत्राचे उल्लंघन करून दुसऱ्या कळपामध्ये जातात. शत्रूचा धोका जाणवताच किंवा अडचणीत सापडल्यास भेकर भुंकल्यासारखा ओरडायला लागतो. कधीकधी त्यांचे भुंकणे तासभर चालू असते.

भेकर दिनचर तसेच निशाचर आहे. उंच गवतात, दाट झाडीत किंवा शेतात पिके वाढल्यानंतर त्यात रात्री फिरणे त्यांना अधिक सुरक्षित वाटते. समुद्रसपाटीपासून दीड ते अडीच हजार मीटर उंचीवरच्या दाट जंगलात त्यांचा वावर असतो. त्याच्या आहारात शेतातील निरनिराळी पिके, फळे, झाडांच्या कोवळ्या डाहळ्या, बिया व पाने यांचा समावेश होतो.

दाट जंगलातून भेकर अधूनमधून चरण्यासाठी गवताळ रानात किंवा शेतीपिकांत शिरतो. झाडांची साल खरवडून काढण्याच्या आणि शेतीपिकावर खाण्याच्या त्यांच्या सवयीमुळे, शेतात घुसलेल्या भेकरांची शिकार मोठ्या प्रमाणावर होते. भेकराचा वावर पूर्व भारतात जास्त आहे. महाराष्ट्रातही याचा वावर बहुतेक जंगलात आहे. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकणात आणि इतर बऱ्याच ठिकाणी भेकर आहेत. सह्याद्रीतील पर्वत रांगेत म्हणजेच पश्चिम घाटात भेकर हरीण मोठ्याप्रमाणात आढळते.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा