वन्यप्राणी- खोकड (शास्त्रीय नावः Vulpes bengalensis इंग्रजी: Indian Fox )

खोकड हा सस्तन प्राणी, मांसाहारी कॅनिड कुळातील आहे. या कुळात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी येतात. खोकड हा प्राणी कोकरी, लोमडी, छोटा कोल्हा व इंडियन फॉक्स अशा नावांनी भारतभर ओळखला जातो. भारतात हिमालयाच्या पायथ्यापासून कन्याकुमारीपर्यंत तो सर्वत्र आढळतो. प्रामुख्याने माळरानावर, खुरट्या झुडपांच्या वनात, शेतात, कालव्यांच्या आसपास त्यांचे अस्तित्व असते. हिमालयाच्या काही भागांत एका वेगळ्या जातीचा खोकड आढळतो. तो तांबडा असतो. या खोकडाच्या शेपटीचे टोक पांढरे असते. त्याला रेड फॉक्स म्हणतात. त्याचे शास्त्रीय नाव व्हल्पिस व्हल्पिस आहे.

खोकड हा कोल्ह्यापेक्षा आकाराने लहान असतो. त्याच्या शरीराची लांबी डोक्यासकट ४५ ते ६० सेंमी. असते. शेपूट २५ ते ३५ सेंमी. लांब असते. वजन १.५ ते ७ किग्रॅ. असते. खोकड आकाराने लहान व सडपातळ असून पाय बारीक आणि लांबट असतात. शरीराचा रंग करडा किंवा राखाडी असतो. डोके, मान आणि कानामागची बाजू पुसट काळसर तर शेपटीचे टोक काळे असते. पायांचा रंग मातकट लालसर असतो. शत्रूपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी तो पळताना आपल्या पायांचा चपळाईने वापर करतो. चटकन वळताना तोल सांभाळण्यासाठी त्याला शेपटीचा उपयोग होतो. हिवाळ्यात उत्तर भारतातील खोकडांना दाट केस येतात. त्यामुळे त्यांचे थंडीपासून संरक्षण होते.

खोकड जमिनीमध्ये खोलवर बिळे खोदतात. बिळाला ३-४ वाटा असतात. संकटकाळी या वाटांचा त्याला उपयोग होतो. बिळ लांबलचक असून त्यात बरीच जागा असते. साधारणतः खोकडांची पिल्ले हिवाळ्यात जन्माला येतात. एका वेळेस जन्माला येणार्‍या पिल्लांची संख्या चार असते. मादीच्या गर्भधारणेचा काळ पन्नास ते पंचावन्न दिवसांचा असतो. नर आणि मादी दोघेही पिल्लांची काळजी घेतात. पिल्ले लहान असताना त्यांना बिळातच लपवून ठेवले जाते.

खोकड निशाचर आहे. दिवसा उन्हाच्या वेळी ते या जागी आराम करतात आणि संध्याकाळी भक्ष्याच्या शोधार्थ बाहेर पडतात. अंधार दाटून आल्यानंतर कोल्ह्याप्रमाणे तेही एकत्र जमून एकसुरात ओरडतात. त्यांचे प्रमुख खाद्य उंदीर, घुशी, सरपटणारे प्राणी, खेकडे, कीटक इ. आहे. कलिंगडे, बोरे, हरभर्‍याचे घाटेदेखील ते खातात. हा प्राणी मनुष्य वस्तीच्या आसपास राहणारा असला तरी कोंबड्या वगैरे पळवीत नाही. उलट तो उंदीर, घुशी, शेतातील किडे खात असतो तसेच पावसाळ्यात पांढर्‍या मुंग्या आणि वाळवीदेखील खातो. खोकडाचे भक्ष्य असणाऱ्या उपद्रवी प्राण्यांपासून शेतीचे रक्षण होऊन शेतकर्‍यांना मदतच होते. खोकडाची पूर्वीपासून शिकार होते. आता त्यांचा नैसर्गिक अधिवास कमी झालाय त्यामुळे खोकडांची संख्या खूपच कमी झालीय. भारतातील धोकादायक प्रजातींमध्ये याचा समावेश असुन, शेतकऱ्यांचा मित्र असणाऱ्या खोकडाला वाचवण्यासाठी लोकसहभागाची अत्यंत गरज आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा