तरस हा श्वान प्रकारातील प्राणी आहे. आफ्रिका आणि आशिया खंडांमध्ये तरस आढळतात भारतात शरिरावर पट्टे असलेल्या प्रकारातले तरस आढळतात. हिंदी मध्ये याला लकडबग्गा तर इंग्रजीत Striped hyena (पट्टेदार तरस) म्हणतात. याच शास्त्रीय नाव Hyaena आहे. भारतातील तरस हे एकटे किंवा त्यांच्या कळपासोबत राहतात. त्यांचा जबडा हा इतर प्राण्यांपेक्षा मोठा असतो. मेलेल्या गाई, म्हशी यांची मोठी हाडे फोडून हे तरस खाऊ शकतात इतका मोठा यांचा जबडा असतो.
तरस हा प्राणी निसर्गातील स्वच्छता करणारा प्राणी म्हणून ओळखला जातो. इतर प्राण्यांनी खाल्लेल्या प्राण्यांचे उरलेले,सडलेले, कुजके मांस हा प्राणी खातो. तसेच इतर छोट्या प्राण्यांची शिकार करुन देखील ते खातात. तरस हा मुख्यत्वे कोरड्या भागात, खुरट्या जंगलात तसेच पठाराच्या भागात आढळणारा प्राणी आहे. डोंगरातील कपारी किंवा जमीनीखाली बिळं करुन हा प्राणी राहतो. कमी पर्जन्यमान असणाऱ्या ठिकाणी त्याचे अस्तित्व अधिक असते. हा श्वान प्रकारातील प्राणी असल्यामुळे तरसामध्ये रेबिज रोग होऊ शकतो. रेबिजची लागण झाली असेल तर ते पिसाळतात व माणसावर हल्ले करुन चावा घेऊ शकतात. त्याचबरोबर तरस जखमी असेल किंवा मादीसोबत पिल्लं असतील तर ती माणसावर हल्ला करु शकते.परंतु तरसाने जाणिवपूर्वक माणसावर हल्ला केल्याच्या घटना क्वचितच आढळतात.
तरस सहसा मानवी वस्तीत येत नाही. मानवी वस्तीत आला तर तो कोंबड्या आणि इतर प्राणी खाण्यासाठी येतात. तरसाला जंगलाची स्वच्छता करणारा प्राणी म्हणतात. तरसाचा जबडा हा सर्व प्राण्यांपेक्षा शक्तीशाली असतो. त्याच्या जबड्यात जबरदस्त ताकद असते. दुसऱ्या प्राण्याने केलेल्या शिकारीची उरलेली हाडे ते खातात. त्याचबरोबर ससे, पक्षी यांची शिकार देखील ते करतात. माणसावर सहसा ते हल्ले करत नाहीत.
तरसाचे आयुष्य साधारण १५ ते २० वर्षांपर्यंत असते. तर त्याचे वजन ३५ ते ४० किलोइतके असते. महाराष्ट्रात हा प्राणी साधारण पठारी प्रदेश, डोंगरी खुरटी जंगले असणाऱ्या भागात, तसेच अहमदनगर,पुणे, विदर्भ या भागात अधिक आढळतो. तरस शक्यतो निर्जनस्थळी राहतात, परंतु शहरीकरणामुळे त्याचा मानवाशी संपर्क वाढू लागला आहे, तरसाचं नैसर्गिक खाद्य कमी होत असल्याने खाद्याच्या शोधात, तरस गाव शहरांच्या जवळपास भटकंती करताना दिसतात.
न्युज अनकट प्रतिनिधी- गुरुराज पोरे.