जालना ,दि.७ जून २०२०: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव शहरी भागाप्रमाणेच आता ग्रामीण भागातही वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने राज्यातील गोरगरीब जनता आणि कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी एक पाऊल उचलले आहे. राज्य शासन कोरोनावर उपचार करण्यासाठी या आजारावर चांगला परिणामकारक ठरेल, अशा रेमडेसिविरच्या १० हजार इंजेक्शनची खरेदी करणार आहे. ज्यांची किंमत सुमारे १२ कोटी रुपये आहे.अशी महिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
बांगलादेशातील एका औषध उत्पादक कंपनीकडून ही औषध खरेदी केली जाणार आहे. याबाबतचा ठराव झाला असून लवकरच याबाबतची प्रक्रिया पूर्ण होईल, जालना येथे शनिवारी( दि.६) रोजी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे आदींची उपस्थिती होती.
या बैठकीला शहरातील सर्व सोईसुविधांनी युक्त असलेल्या मोठमोठ्या रुग्णालयातील डॉक्टरांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी या डॉक्टरांना प्रत्येकी तीन तास कोरोना रुग्णांना सेवा देण्यासंदर्भात सुचना करण्यात आल्या आहेत.
तसेच जालना जिल्ह्यातील कोरोनाच्या संभाव्य रुग्णांचे स्वॅब नमुने तपासण्यासाठी आता औरंगाबादला जाण्याची गरज नाही. या तपासणीसाठी पुढील आठवड्यामध्ये जालन्यातच प्रयोगशाळा सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून विशेष बाब म्हणून सव्वा कोटी रुपये खर्चही मंजूर झाला आहे. या प्रयोगशाळेत फक्त कोरोनाच्याच नव्हे तर इतरही आजारांच्या तपासण्या केल्या जातील, अशीही माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.
न्युज अनकट प्रतिनिधी: