मुंबई, 14 जुलै 2022: एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाराष्ट्रात मोठी उलथापाल झाली. शिंदे गटाने भाजप सोबत हात मिळवणी करून सरकार स्थापन केलं. मात्र या सर्व घडामोडी दरम्यान राज ठाकरे यांचे एकही वक्तव्य आले नाही. विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुका होण्यापूर्वी त्यांनी आपल्या सभा घेतल्या होत्या. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीकांचा भडीमार केला होता. मात्र राज्यसभा निवडणुकीनंतर त्यांच्याकडून एकही वक्तव्य आले नाही. कारण त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र आता त्यानंतर ते पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंची आज भेट घेणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच फडणवीस राज ठाकरे यांची भेट घेणार होते. मात्र राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असल्याने ते शक्य झाले नाही. या दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे पूरग्रस्त भागात दौरे करत होते. मात्र आता ते आज राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. ही भेट सकाळी 11 वाजता होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ही भेट राज ठाकरे यांच्या निवासस्थानी होणार आहे. त्यावेळी फडणवीस राज यांच्या तब्येतीची विचारपूस करतील. तसंच राज्यातील राजकीय स्थिती आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये महत्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे