एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार का?

बारामती, २१ ऑक्टोबर २०२०: बारामती एसटी आगारातील कर्मचाऱ्यांना मागील दोन महिन्यांचा पगार झाला नसल्याने आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. तर पगार व सानुग्रह अनुदान शासनाने वेळेत दिले तर आमची दिवाळी गोड होईल असे कर्मचाऱ्यांनी हताशपणे लोकमतशी बोलताना सांगितले.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बस मार्च महिन्यापासून उभ्या आहेत. सध्या बस गाड्या पूर्ण क्षमतेने धावत नाहीत तर काही ठिकाणच्या गाड्या सुरू आहेत. त्यामुळे त्याच बस व कंडक्टरला बोलावले जाते आहे. त्यात देखील महिन्यातील फक्त आठ दिवसच काम तर बाकीचे दिवस बिनपगारी रजा पकडली जाते आहे. ज्यांच्या सुट्ट्या शिल्लक आहेत त्या कापल्या जातात तर त्या कर्मचाऱ्याला आठ दिवसांचाच मेहनताना मिळत आहे. एवढ्या कमी पगारात घर कसे चालवायचे हा यक्ष प्रश्न सध्या बारामती एसटी कामगारांना पडला आहे.

बारामती एसटी आगारात धावणाऱ्या गाड्यांची संख्या कमी असल्याने एसटीने ट्रान्सपोर्टचा पर्याय निवडला. मात्र यामध्ये देखील ज्या भागात माल खाली केला जातो मात्र तिथून परतीचा माल मिळायला जर दोन ,चार दिवस लागले तरी ड्रायव्हरने तिथे आपल्या राहण्याची व खाण्याची व्यवस्था करावी लागते तर राज्यात कोणत्याही भागात जावे लागत आहे. यामध्ये आठ दिवस देखील लागतात मात्र कोरोना संसर्गाच्या बिकट परिस्थितीत हे कर्मचारी काम करत आहेत. तर कामात काही कुचराई झाली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते आहे.

तर बारामती आगारातील १५ ड्रायव्हर व १५ कंडक्टर दर आठवड्याला मुंबई येथे बेस्टशी एसटीचा करार असल्याने कामासाठी मुंबई येथे पाठवतात मात्र मुंबईत त्यांची जेवणाची काही सोय नाहीतर राहण्याची व्यवस्था लांब असल्याने त्यांना स्वखर्चाने प्रवास करावा लागत असल्याने त्यांना परवडत नाही. तर जेवणाच्या अळ्या निघाल्याचे येथे गेलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.

शासनाने या कोरोना संसर्गाच्या बिकट काळात एसटी कर्मचाऱ्यांना सॅनिटायजर, मास्क, ग्लोज कोणतेही साहित्य दिलेले नाही असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

नियमित पगार नसल्याने कामगारांची आर्थिक ओढाताण होते आहे. मग कामगार कामगार सोसायटी पतसंस्था, सावकारांकडे पाय वळत आहेत. तर काही लोक कामगारांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन सावकारी करत आहेत. याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

मुंबई येथे काम करत असताना गणेश शिवाजी खोमणे हे कामावर जाण्याच्या गडबडीत बाथरूम मध्ये पाय घसरून पडले त्यांना पायला गंभीर दुखापत झाली आहे. मग खोमणे यांच्या नातेवाईकांना बोलाऊन आमच्याकडून मदत मिळायला दोन तीन दिवस लागतील असे सांगितल्यावर खोमणे यांचे चुलते प्रताप खोमणे यांनी त्यांना खाजगी गाडीत आणून बारामती मध्ये खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

आता मागील दोन महिन्यांचा पगार व सानुग्रह अनुदान याबाबत सध्या काही सांगता येत नाही. शासन लवकरात लवकर याबाबत निर्णय घेईल असे आगर व्यवस्थापक अमोल गोंजारी यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा