मिलिंद नार्वेकर उद्धव ठाकरेंची साथ सोडणार का?

मुंबई, १ ऑक्टोंबर २०२२ : राज्यात सध्या खरी शिवसेना कोण यावरुन शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंमध्ये वाद सुरु असताना दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. दुसरीकडे, शिंदे गट आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशदेखील होत असून, आपली बाजू भक्कम आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न होत आहे.

नुकतंच बाळासाहेब ठाकरेंचे सेवक चम्पासिंग थापा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेला धक्का बसला आहे. त्यातच आत्ता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे विश्वासू असलेले मिलिंद नार्वेकर शिवसेना सोडणार असून, ते शिंदे गटात येणार असल्याचा गौप्यस्फोट पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात केला आहे.

गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?

गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. जर धनुष्यबाण चिन्ह गेलं तर उद्धव ठाकरे यांच्याकडे पाच आमदार देखील राहणार नसल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. चंपासिंग थापा हे बाळासाहेबांचे अत्यंत विश्वासू होते. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य बाळासाहेबांच्या चरणी घातलं, ते चंपासिंग थापा देखील यांना सोडून आले. आता मिलिंद नार्वेकरही आमच्याकडे येणार असल्याचं एकतो आहे, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहेत.

काही दिवसांपूर्वीच शिंदे गटातील आमदारांनी शिवसेनेतील अजून काही आमदार शिंदे गटात येतील आणि शिवसेना शिल्लक सेना राहील, असे विधान भाजपा आमदार आणि शिंदे गटातील आमदारांनी केले होते. दरम्यान गुलाबराव पाटील यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू असलेले मिलिंद नार्वेकर निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे शिवसेनेला एकीकडे बळकटी मिळवण्यासाठी शिवसेना प्रयत्न करत असतानाच निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नार्वेकर शिवसेनेला सोडतील की, शिवसेनेला मजबूत बनवण्यासाठी प्रयत्न करतील याकडे सर्व राजकीय पक्षांच लक्ष असणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा