नवी दिल्ली, १० ऑगस्ट २०२२: प्रेषित मोहम्मद यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नुपूर शर्मा यांच्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि बी पार्डीवाला यांचं खंडपीठ नुपूर शर्मा विरुद्ध वेगवेगळ्या राज्यांमध्ये दाखल असलेले खटले दिल्लीला हस्तांतरित करण्याचा विचार करू शकतात. नुपूरच्या वकिलाने सर्व प्रकरणं दिल्लीला हस्तांतरित करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. १९ जुलै रोजी झालेल्या मागील सुनावणीत न्यायालयाने नुपूरच्या अटकेला १० ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली होती.
नुपूरला दिलासा मिळणार की अटक होणार?
गेल्या सुनावणीत नुपूरला दिलासा देताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनाही नोटीस बजावलीय. नुपूर शर्मा यांच्यावर कोणतीही जबरदस्ती कारवाई करू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले होते. सुनावणीदरम्यान नुपूर शर्माची बाजू मांडणारे वकील मनिंदर सिंग यांनी सांगितलं की, तिच्या जीवाला गंभीर धोका आहे.
नुपूरच्या जीवाला धोका
नुपूरने न्यायालयाला सांगितलं की, तिच्या जीवाला धोका आहे. सुप्रीम कोर्टाच्या प्रतिकूल टिप्पणीमुळे तिला अराजक घटकांकडून जीवाला धोका असल्याचे नुपूरचं म्हणणं आहे. अटकेसाठी तिने न्यायालयाकडं दिलासाही मागितला होता. आपल्या याचिकेत तिने वेगवेगळ्या राज्यांमध्ये नोंदवलेल्या ९ एफआयआर एकाच ठिकाणी हस्तांतरित करण्याची मागणीही केली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे