पुणे, ३० सप्टेंबर, २०२२ : पंकजा मुंडे विरुद्ध अमोल मिटकरी हे युद्ध सध्या जोरदार सुरु आहे. याला कारणीभूत अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दलचे केलेले विधान आहे. पंकजा मुंडे या भाजपामध्ये अस्वस्थ असून त्या लवकरच भाजपाला सोडचिठ्ठी देतील, असं मिटकरींनी म्हटलं होतं. तसेच त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्या, तर त्यांचं स्वागतच असल्याचं सूचक विधानही मिटकरींनी केलं आहे. विशेष म्हणजे पंकजा यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भात पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंचंही मत सकारात्मक असल्याचे संकेत मिटकरींनी दिले आहे.
मिटकरींनी पंकजा मुंडेंचा उल्लेख केल्याने त्यांनी परळीमधील नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात केलेल्या ‘मीच बेरोजगार आहे’ या विधानावरुन पत्रकाराने प्रश्न विचारला. मी तुम्हाला काय रोजगार देऊन मी बेरोजगार आहे अशा पद्धतीचं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच तुम्ही त्यांना आवाहन केलं होतं की, राष्ट्रवादीत या. तर आत्ता या संदर्भात काय बोलणार ? असा प्रश्न पत्रकाराने विचारला.
या प्रश्नावर उत्तर देताना मिटकरी म्हणाले की, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की, त्या मुद्द्यावर मी ठाम आहे. पंकजाताईंना डावलण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीमध्ये सुरु आहे. तो प्रयत्न फडणवीस सरकारकडून सातत्याने होत आहे. आतापर्यंतही त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली गेलेली नाही. त्या गोपीनाथराव मुंडेसाहेबांच्या कन्या आहेत. तोलामोलाच्या आणि महाराष्ट्रातील वजनदार नेत्या आहेत. पण आतापर्यंतही त्यांना न्याय मिळालेला नाही. त्यामुळेच त्या अस्वस्थ आहेत. माझा विश्वास आहे की, पंकजाताई लवकरच मोठा निर्णय घेतील. भाजपला सोड चिठ्ठी देतील असे विधान मिटकरींनी केले.
वास्तविक याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. यामध्ये मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. मला कोणी संपवू शकत नाही. असा इशारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला होता. तसेच, नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना “मी बेरोजगार आहे. मी तुम्हाला काय रोजगार देऊ?” असा उलट सवाल उपस्थित केला होता. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.
त्यावरुन एकुणच हे रामायण रंगले आहे. वाद-प्रतिवाद अशा या रामायणात कोणाला वनवास तर कोणाला सत्ता मिळणार हे पहाणं औत्युक्याचं ठरेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी – वैभव शिरकुंडे