जिल्हाधिकारी यांचे आदेश हवेत विरणार ?

कुरकुंभ, दि. ११ जुलै २०२०: दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगीक क्षेत्राचे सुरक्षा ऑडीट करण्यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी (१० जुन) रोजी कुरकुंभ औद्योगीक क्षेत्रातील प्रकल्पांचे व्यवस्थापक व इतर अधिकाऱ्यांची बैठक आयोजीत केली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी दौंड तालुक्याच्या पाहणी दौऱ्या दरम्यान कुरकुंभ औद्योगीक क्षेत्रातील विविध समस्यांवर यामध्ये चर्चा झाली होती. प्रामुख्याने कोरोनाच्या जागतीक महामारीत कामगारांच्या अभावाने उद्योगांना कराव्या लागणाऱ्या अडचणी व परिसरातील वाढत्या अपघाताच्या घटना यावर तातडीने निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आली होते.

गेल्या काही वर्षापासून औद्योगीक क्षेत्र विविध दुर्घटनेने हादरत असल्याने नागरीक व कामगार यांना विविध अडचणी येत आहेत. सुरक्षे यंत्रणेत असणाऱ्या मोठ्या प्रमाणातील त्रुटीमुळे अपघाताच्या घटना वाढल्याचे वारंवार निदर्शनास येत असल्याने याबाबत ग्रामस्थांनी आक्षेप घेतला होता त्यानुसार लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी व औद्योगीक क्षेत्राशी निगडीत इतर विभागाच्या विविध स्तरावर बैठका झाल्या होत्या. मात्र यामध्ये कुठलाच ठोस निर्णय आज पर्यंत झाल्याचे दिसून येत नाही.

अपघाताच्या वाढत्या घटना परिसरातील जनजीवन विस्कळीत करीत असल्याने याचे परिणाम उद्योगांना येणाऱ्या विविध अडचणीतून दिसून येत आहेत मात्र याचा फारसा गांभीर्याने विचार होताना दिसत नाही.
दरम्यान जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत कंपनी व्यवस्थापन व कुरकुंभ औद्योगीक क्षेत्रातील अग्निशामक दलाच्या मधील विसंवाद समोर आला होता. जिल्हाधिकारी यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत औद्योगीक क्षेत्रातील सवर्च कंपन्यांचे फायर ऑडीट करण्याचे निर्देश दिले होते. मात्र याकडे देखील तत्सम यंत्रणेने कानाडोळा केल्याचे आढळून येत आहे.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशावर पुढे काहीच निर्देश आले नसल्याची माहिती औद्योगीक विकास महामंडळाचे उपभियांता मिलिंद पाटील व अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी सुधीर खांडेकर यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

कुरकुंभ येथील रासायनीक प्रकल्पात जगभरातील नामवंत रासायनीक प्रकल्प कार्यरत आहेत. कंपनीच्या सुरुवातीच्या काळात अग्निशामक दलाकडून सुरक्षेच्या उपकरणाच्या बाबतीत परवानग्या दिल्या जातात. तद्नंतर प्रत्येक कंपनीला दर सहा महिन्याला या सर्व यंत्रणा व्यवस्थित कार्यन्वित असल्याचा लेखी पुरावा अग्निशामक दलाला देणे गरजेचे असते. मात्र असे असताना देखील फक्त बोटावर मोजण्या इतकेच कंपन्या हा नियम पाळत असुन अन्य कंपन्या याकडे सरार्स दुर्लक्ष करीत असल्याची माहीती अग्निशामक दलाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे सुरक्षेच्या बाबतीत कंपनी व्यवस्थापनच गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: रिजवान शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा