पुणे, ३ ऑगस्ट २०२२: राज्यात गेले दोन महिने राजकीय वातावरण ढवळून निघताना आपण पाहत आहोत. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या प्रमुख पक्षांमध्ये राजकीय चढाओढ आपणास पाहायला मिळत आहे. कोणी बहुमत सिद्ध करतंय तर कोणी विरोधी पक्षांवरती टीकेचे बाण सोडतंय, पण यामधून नक्की काय साध्य होणार आहे.
वेगवेगळ्या पक्षांमधून आमदार,खासदार या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात जाताना आपणास दिसत आहेत. पण महाराष्ट्राला यातून काय मिळतंय ? एकीकडं अतिवृष्टीमुळं शेतकरी संकटात आहे, सामान्य जनतेला पूर परिस्थितीचा सामना करावा लागत आहे, कोणाची घरे उध्वस्त झाली आहेत, तर कोणाची जिवाभावाची माणसं पुराच्या पाण्यात वाहून गेली. स्थापन झालेलं २ लोकांचं सरकार मदतीचा ओघ यांच्याकडं पाठवत आहेत परंतु प्रत्यक्षात ती मदत गरजूपर्यंत पोहचत आहे की नाही याकडे कोणाचं लक्ष आहे का हे सांगणे मात्र अवघड आहे.
सगळे राजकीय पक्ष आम्ही कसे सरकार चालवण्यास सक्षम आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, कोणी कोर्टात याचिका दाखल करताय तर कोणी प्रतिज्ञापत्र सादर करत आहे. कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत कि आपला नेता कोण? आणि आपला पक्ष कोणता? नक्की समर्थन कोणाला द्यायचं. कायदेतज्ज्ञ सुद्धा असे प्रसंग महाराष्ट्राच्या राजकारणात क्वचित पाहायला मिळत असल्याचं सांगतायत.
पण सामान्य जनता यात नकळत भरडली जातीये. महागाई, इंधन दरवाढ, जी एस टी यामध्ये दैनंदिन जीवन जगत असताना येणाऱ्या आर्थिक अडचणींचा सामना करताना सामान्य नागरिक जेरीस येताना दिसतोय. या राजकीय पेचात नुकसान होतंय ते फक्त सामान्य जनतेचं. या सर्व गोष्टींचा परिणाम एकंदरीतच आपल्या राष्ट्रीय वलयामध्ये महाराष्ट्राच्या प्रतिमेला नुकसानकारक ठरू शकते हे ही तितकंच खरं.
सामान्य जनतेचं या सर्व गोष्टी सुरळीत होऊन एक प्रकारचे सर्वसामान्य जीवन जगता यावे यासाठी यंत्रणेला घटनात्मक बाबींचा विचार करून सर्व परिस्थिती पूर्ववत करावी हेच मागणं असावं.
न्युज अनकट प्रतिनिधी; किरण कानडे.