शेगाव येथील सभा राहुल गांधींसाठी आव्हान ठरणार?

औरंगाबाद, १८नोव्हेंबर २०२२ : राहुल गांधी यांची शेगावची सभा ही त्यांच्या महाराष्ट्रातील भारत जोडो यात्रेची महत्त्वाची सभा म्हणून पाहिली जात आहे. काँग्रेस तसेच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते येथे शक्तिप्रदर्शन करणार असेही म्हटले जात आहे.

मात्र, वाशीम तसेच अकोला येथील पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधींनी सावरकरांवरील आरोप अधिक स्पष्टपणे बोलून दाखविले. सावरकर हे ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते. त्यांच्यासाठी काम करीत होते. ‘मै अपना नौकर रहना चाहता हूं…’ असं सावरकरांनी ब्रिटिशांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे, असा दावाही राहुल गांधी यांनी एक पत्र वाचून दाखविल्यानंतर केला. या राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर भाजप मनसेचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत.

तर पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सावरकरांच्या पुतळ्यापुढे ‘माफीवीर’ असा मजकूर लिहून बॅनरबाजी केल्याने पुण्यातले वातावरणही तापण्याची शक्यता आहे. गेले दोन दिवस याच मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राहुल गांधी यांच्यावर काँग्रेसव्यतिरिक्त पक्षांनी चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मनसैनिक राहुल गांधींचा भारत जोडो यात्रेला काळे झेंडे दाखवून मनसे निषेध नोंदविणार आहेत.

शेगाव येथील सभेत मोठ्या संख्येने काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, कार्यकर्ते जमणार आहेत. ही सभा दुपारी तीन वाजेच्या सुमारास होणार आहे. औरंगाबादमध्ये नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे हे उपस्थित आहेत. इथून मनसे कार्यकर्ते लवकरच शेगावच्या दिशेने निघणार आहेत. तर मनसे आणि भाजप आक्रमक झाल्याने हजारोंच्या संख्येने आंदोलनकर्तेही येथे जमा होत आहेत. या परिस्थितीमुळे पोलिसांसमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. औरंगाबाद, नाशिक, मुंबई, पुण्यातून मनसेचे कार्यकर्ते शेगावच्या दिशेने निघाले आहेत. त्यामुळे दुपारच्या सभेत राजकीय राडा होऊ शकतो, याचा अंदाज घेत शेगावमध्ये तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राहुल गांधी यांची शेगावची सभा सुरळीत पार पडणार का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा