नववर्षात पुण्यातील प्रकल्पांना गती येणार, की नागरिकांचा अपेक्षाभंग होणार?

पुणे, २६ डिसेंबर २०२२ : पुणे शहरात गेल्या वर्षभरात शहर आणि परिसराच्या विकासाला गती देण्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या विविध प्रकल्पांची प्रगती झाली. मेट्रो प्रकल्प, पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे, रिंग रोडचे भूसंपादन या प्रकल्पांची कामे काहीअंशी पुढे सरकली आहेत; परंतु अन्य प्रकल्पांच्या कामात कोणतीही प्रगती झालेली नाही. त्यामुळे अन्य प्रकल्पांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीत गती मिळाल्यास खऱ्या अर्थाने पुणे हे स्मार्ट सिटी होईल. अधिवेशनाच्या निमित्ताने नववर्षात अनेक प्रकल्प मार्गी लागतील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली गेली आहे.

या प्रकल्पांमध्ये मुंबई-पुणे-हैदराबाद हायस्पीड रेल कॉरिडोर, नगर रस्त्यावरील उड्डाणपूल, प्रॉपर्टी कार्ड, बोगद्यातून पाणी नेण्याची योजना, पुरंदरचे नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ, ‘एसएसआरडी’चा रिंग रोड, ‘पीएमआरडी’चा रिंग रोड, ‘एचसीएमटीआर’ रस्ता हाय कॅपॅसिटी मास ट्रान्झिट रूट, महामेट्रो आणि पीएमआरडीए मेट्रो, जायका प्रकल्प, लोणावळा लोहमार्गाचे चौपदरीकरण, झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड लोहमार्ग, पाणी कोटा यांचा समावेश आहे.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मोठ्या प्रमाणात आरोप-प्रत्यारोप झाले. त्या गोंधळात पुणे शहरातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांकडे दुर्लक्ष केले गेले; परंतु आता हे प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे योग्य ती पावले उचलावी लागतील, असे मत अनेक नेत्यांनी व्यक्त केले आहे. शहर व परिसरातील कॅन्टोन्मेंट बोर्डांना ‘जीएसटी’मधील निधीचा हिस्सा मिळावा. नदीतील प्रदूषण आणि जलपर्णींमुळे होणारा उपद्रव, खडकी परिसरात वाढत असलेली गुन्हेगारी, अवैध धंदे यांबाबतचे प्रश्न विधिमंडळात उपस्थित करणार असल्याचे भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.

तर पुण्यातील प्रकल्पांवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी नगर रोड वाहतूक आणि बीआरटी, शहराचा पाणीप्रश्न, शिवणे, खराडीसह रस्त्यांचे प्रश्न, पावसाळ्यात वडगाव शेरीसह पुण्यात निर्माण होणारी पूरस्थिती यांसह शहरासंदर्भातील ६२ तारांकित प्रश्न आणि ६ लक्ष्यवेधी मांडले असून, त्याबाबत विधानसभा अध्यक्षांना भेटून चौकशी करू, असे आश्वासन दिले आहे. तर महावितरणकडून वितरित होत असलेली चुकीची बिले, मेट्रोचे विस्तारित मार्ग, चैतन्यनगरीमधील मैदानाचा प्रश्न, ३४ गावांचा रखडलेला विकास आणि त्यासाठीचे नियोजन हे मुद्दे मांडणार असून, शिंदे बोगदा आणि नवले पुलादरम्यान वारंवार होत असलेल्या अपघातांचा मुद्दाही अधिवेशनात उपस्थित करणार असल्याचे भाजप आमदार भीमराव तापकीर यांनी सांगितले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा