पुणे, २६ जुलै २०२३ : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये मनोमिलन झाल्याने पुरंदर तालुक्यात होणारा आतंरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प बारामतीच्या दिशेला सरकणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजप-शिवसेनेच्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात पुरंदर तालुक्यातील विमानतळ पुण्याच्या बाजूला असलेल्या गावात करावा, असा आग्रह धरण्यात आला होता.
ते सरकार गेले आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर हा विमानतळ बारामतीच्या बाजूला वळविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. पुरंदर तालुक्यातील बारामती तालुक्याच्या हद्दीतील गावांच्या वेशीवर हे विमानतळ करण्यात यावे या मागणीने जोर धरला. स्थानिक नेते बदलले तसेच जागा बदलाचेदेखील वारे वाहू लागले. बारामतीकडे सरकणारे विमानतळ रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घातले होते.
नव्या जागेचा नाद सोडा असे अधिकाऱ्यांना बजावत मंजूर असलेल्या जुन्या जागेवरच विमानतळाचे काम सुरू करण्याचा फडणवीस यांचा आग्रह होता, तर अजित पवार यांचा बारामतीच्या बाजूला विमानतळ नेण्याकडे कल होता. अजित पवार यांच्या भूमिकेला फडणवीस यांचा छुपा विरोध होता. आता मात्र दोन्ही नेते एकत्र आल्याने विमानतळाचे ‘टेक ऑफ’ कोणत्या दिशेला होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर