मनसे आणि भाजप युती होणार का?

मुंबई, ३० ऑगस्ट २०२२: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवीन घर घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या गोष्टीला फार काळ उलटला नसेल, तेवढ्यात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर गेले आणि राज ठाकरे यांची भेट घेतली.

शिंदे- फडणवीस गट बाहेर पडल्यानंतर शिवसेना मोडकळीस येण्याची चिन्हे दिसू लागली. याच दरम्यान राज ठाकरे यांनी एका माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंवर घणाघात केला. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे हा माणूस विश्वास ठेवण्यासारखा नाही. तो बोलतो एक आणि करतो वेगळं, असं म्हणत त्यांच्यावर टीकास्त्र डागलं.

याच पार्श्वभूमीवर आता मनसे आणि भाजप एकत्र येणार का? या चर्चांना उधाण आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनीही राज ठाकरे यांची भेट घेतली. पण या सर्व भेटीमागचं रहस्य नक्की काय, हे समजायला नक्की वेळ लागेल.

पण भाऊबंदकी कधीच यशस्वी होत नाही, हा इतिहास आहे. जो इतिहास राज आणि उद्धव ठाकरे यांच्याबाबतीतही लागू होतो. सध्याच्या राजकारणात फडणवीस अग्रेसर असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे मनसे आणि भाजप यांची युती झाल्यास यातही फडणवीसांचा हात असेल, हे डोळे झाकून कोणीही सांगेल.

पण याचा नक्की फायदा कोणाला होणार ? या प्रश्नाचे उत्तर दोघांना असेच आहे. जर भाजप आणि मनसे युती झाली, तर भाजपला अजून जास्त जागांवर लढता येईल. तर मनसेची ताकद वाढेल. त्यामुळे दोघांनी एकमेकांच्या हातात हात घालून निवडणूक लढल्यास दोघांना फायदा होईल हे निश्चित. आता सगळं लक्ष हे दोघांच्या निर्णयाकडे आहे.

तर दुसरीकडे याचा फटका उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण आता शिवसेनेची ताकद कमी झाली आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी दौ-याला सुरुवात केली. त्याचा फायदा त्यांना मिळेल की नाही, हे आगामी निवडणुकीतच पाहता येईल.

पण सध्या मनसे भाजप युती ही नक्कीच शिवसेनेसाठी किंबहुना मविआसाठी घातक ठरण्याची शक्यता आहे, हे मात्र नाकारता येत नाही. आता कोण काय पावलं उचलणार, यावर सर्व समीकरणे अवलंबून आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा