तुम्ही आमची साथ सोडाल का? बॉलिवूडच्या परिस्थितीवर रोहित शेट्टीचा सवाल

मुंबई, २२ डिसेंबर २०२२ : बॉलिवूडला फारच कठीण परिस्थितीचा संघर्ष करावा लागत आहे. दक्षिणात्य चित्रपटांच्या तुलनेने बॉलिवूडचे वेड कमी झाले आहे, असे म्हणणाऱ्यांना दिग्दर्शक रोहित शेट्टीने योग्य उत्तर दिले. रोहितच्या नवीन चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान बॉलिवूडवर बोट ठेवणाऱ्यांना रोहित शेट्टीने अगदी ठामपणे उत्तर देत उपस्थितांचे मन जिंकले आहे. रोहित शेट्टीच्या बोलण्याने अभिनेता रणवीर सिंग, वरुण शर्मा आणि उपस्थित सर्वच प्रेक्षक आवाक् झाले. नक्की झालं काय ते पाहूयात…

रोहित शेट्टी त्याच्या चित्रपटाचे प्रमोशन करीत असताना, ‘कांतारा’, ‘आरआरआर’, ‘पुष्पा’ या सिनेमांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं, मग या सगळ्यात बॉलिवूड संपलं का? बॉलिवूडची जादू कमी झाली का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारताच रोहित शेट्टी म्हणाला, की दोन वर्षे आपण कोरोनासारख्या संकटाचा सामना केला‌. अनेक मोठ्या सिनेमांचे शूट्स सुरू झाले नाही किंवा काही चित्रपट प्रदर्शित होऊ शकले नाहीत. जे प्रदर्शित झाले ते सगळे आधीच तयार झाले होते; मात्र वर्षाच्या सुरवातीला ‘भूलभुलय्या २’ चालला, ‘कश्मीर फाइल्स’ चालला, ‘दृश्यम २’ चालतोय, ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपटही तुफान चालला. तुम्ही दक्षिणात्य चित्रपटांची नावे घेतलीत मीसुद्धा बॉलिवूड सिनेमांची नावे घेतली.

अजूनही राजकुमार हिरानी यांचा सिनेमा आलेला नाही. संजय भन्साळी सर रणवीरसोबत एक मोठा सिनेमा करण्याच्या तयारीत आहेत.’टायगर ३’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. इतकी वर्षे आम्ही मनोरंजन केलं, एक वर्ष आमचं खराब काय झालं. तुम्ही आमची साथ सोडाल का? कोरोनामध्ये पन्नास टक्के लोकांनाच थिटरमध्ये परवानगी होती तेव्हाही ‘सूर्यवंशी’ चित्रपटाने १९६ कोटींची कमाई केली. तर आज त्याची कमाई सरासरी ३५० कोटींपर्यंत आहे. बॉलिवूड पुन्हा एकदा भरारी घेईल, असे म्हणत रोहित शेट्टीने त्याचे मत मांडले.

रोहित शेट्टीच्या या प्रखर उत्तराने टाळ्या वाजवत उपस्थितांनी त्याच्या बोलण्याला दाद दिली. सध्या रोहित शेट्टीचा आगामी चित्रपट ‘सर्कस’ प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा चित्रपट २३ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असून, प्रमोशनदरम्यान रोहितने हे उत्तर दिले.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : ऋतुजा पंढरपुरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा