विप्रो देणार ४५० खाटांचे विशेष कोविड रुग्णालय

पुणे, दि. ५ मे २०२०: विप्रो कंपनीने पुण्यामध्ये असलेल्या आपल्या कार्यालयांना कोरोना उपचारासाठी कोविड रुग्णालयांमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे येथे ४५० खाटांचे  विशेष कोविड रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी नुकताच महाराष्ट्र शासनासमवेत यासंबंधीचा सामंजस्य करार केला आहे. हे विशेष कोविड रुग्णालय पुण्याच्या हिंजेवाडी येथे माहिती तंत्रज्ञान कॅम्पसमध्ये सुरु करण्यात येणार आहे.

विप्रो ने सांगितले आहे की, ३० मे पर्यंत हे रुग्णालय महाराष्ट्र सरकारच्या हवाली करण्यात येईल. ४५० बेड असलेल्या या हॉस्पिटल मध्ये १२ बेड असे असतील जिथे गंभीर रुग्णांचा उपचार केला जाईल. यासह २४ अशा खोल्या प्रदान करण्यात येणार आहेत ज्यामध्ये रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी राहू शकतील.

विप्रो या रुग्णालयाशी संबंधित लागणारी बांधकाम व्यवस्था, वैद्यकीय उपकरणे आणि इतर मदत देखील देणार आहे. मागच्या महिन्यामध्ये विप्रो, विप्रो इंटरप्राइजेस आणि अजीम प्रेमजी यांनी कोरोनाशी लढण्यासाठी १,१२५ कोटी रुपये मदत करण्याचे आश्वासन दिले होते. विप्रो आणि अझीम प्रेमजी फाऊंडेशनच्या वतीने मुंबई, पुणे, औरंगाबाद, अमळनेर, अहमदनगर, अकोला, बीड, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे मानवतावादी आणि आरोग्यसेवा मदतकार्य सुरू आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा