पुरंदर दि.७ नोव्हेंबर २०२० :तीर्थक्षेत्र जेजुरी नगरीत खंडोबा देवाच्या यात्रा जत्रा निमित्त बंदोबसासाठी येणारे पोलीस कर्मचारी यांना निवास व्यवस्था तसेच विविध बैठका व कार्यक्रमासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या पुढाकारातून व लोकसहभागातून जेजुरी पोलीस स्टेशन आवारात मार्तंड सभागृहाचे काम पूर्ण झाले आहे .
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाचा जेजुरी नगरीत वर्षातून दोन वेळा सोमवती यात्रा,महाशिवरात्री,चैत्र पौर्णिमा,माघ पौर्णिमा,पौष पौर्णिमा,चंपाषष्ठी, महाशिवरात्री या आठ यात्रे बरोबरच लग्नसराई,मार्च ते जून महिन्यापर्यंत देवकार्य तसेच दर रविवारी यात्रेचे स्वरूप असते.वर्षाकाठी ५० लाखाहून अधिक भाविक जेजुरीत असतात .यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त बोलवावा लागतो.बंदोबस्तासाठी आलेल्या या पोलीस बांधवांची निवास व्यवस्था व्हावी तसेच पोलीस पाटील,नागरिक यांच्या वारंवार बैठका होत असतात अशा विविध कार्यक्रमासाठी सभागृह बांधण्याचा निर्णय सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी घेतला होता .
जेजुरी पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या मोकळ्या जागेत लोकसहभागातून या इमारतीचे बांधकाम लोकसहभागातून सुरू करण्यात आले . या कामासाठी जेजुरी औद्योगिक वसाहतीतील इंडियाना ग्रेटिंग्ज, जेजुरी उद्योजक संघ,बल्लाळेश्वर उद्योग समूह,व्ही टी सी थ्री पी एल सर्व्हिसेस शिवरी,सिद्धार्थ कन्ट्रक्शन नीरा तसेच नागरिकांनी वस्तू रूपाने सहकार्य केले . या सहकार्यातून ही वास्तू उभी राहिली आहे . दोन हजार चौरस फूट बांधकामाच्या सभागृहासासाठी सुमारे २१ लक्ष रुपये आवश्यक होते , लोक सहभाग व विविध उद्योग समूहांनी सहकार्य केल्याने हे काम पूर्ण होऊ शकले . विशेष म्हणजे जेजुरी पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून या बांधकामासाठी मदत केली आहे . या मार्तंड सभागृहात २०० आसनव्यवस्था होऊ शकते. यापुढे पोलीस अंमलदार यांना निवास , बैठका ,कार्यक्रम येथे होतील असे एपीआय अंकुश माने यांनी सांगितले व सहकार्य करणाऱ्यांचे आभार व्यक्त केले .
न्यूज अनकट प्रतिनिधी