पुणे, दिनांक ६ सप्टेंबर २०२२: पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये कुरवंडी येथे घराबाहेर बांधलेली गाई सोडण्यासाठी गेलेल्या महिलेवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने प्राण घातक हल्ला केला. परंतु या महिलेने मोठ्या धाडसाने प्रतिकार करून बिबट्याचा हल्ला परतवून लावला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली आहे
आंबेगाव तालुक्यात कुरवंडी येथे कलाबाई मते चव्हाणवस्ती येथे राहायला आहेत. येथे जवळच असणाऱ्या वनविभागाच्या क्षेत्रामध्ये त्या त्यांची गाय चरण्यासाठी बांधत असतात. रात्री सात वाजताच्या सुमारास त्या गाय सोडून आणायला गेल्या, त्यावेळी बाजूलाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.
परंतु त्यांनी प्रसंगावधान दाखवत जोरदार प्रतिकार केला. आणि बिबट्या चा हल्ला धाडसाने परतावून लावला. मात्र या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला मोठी जखम झाली आहे. या हल्ल्यातून बचावलेल्या या महिलेच्या धाडसाची परिसरात सर्वत्र चर्चा आहे.
बिबट्याच्या हल्ल्यातून ही महिला बचावली. परंतु या प्राणघातक हल्ल्या मध्ये महिलेच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. महिलेच्या डोक्याला टाके घालण्यात आले असून, त्यांच्यावर मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. सदर घटनेनंतर वन विभागाने परिसरात पिंजरा लावून या बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अनिल खळदकर