दिंडोरी, नाशिक २८ एप्रिल २०२४ : नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील खतवड येथे विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या दोन मुलांसह शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडलीय. संबंधित विवाहितेच्या नातेवाईकांनी घटनेस जबाबदार पती,सासू दिर यांचे विरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे .
चांदवड तालुक्यातील धोंडगव्हाणवाडी येथील चंद्रकांत नारायण पुरकर यांची मुलगी अश्विनी सुदाम मुळाणे, वय ३१ हिचा विवाह २०१२ मध्ये खतवड तालुका दिंडोरी येथील अर्जुन सुदाम मुळाणे यांच्यासोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवसापासूनच अश्विनी हिचा माहेरून पैसे आणण्यासाठी छोट्या मोठ्या कारणाने शारीरिक मानसिक छळ सुरू झाला. पुरकर कुटुंबीयांनी वेळोवेळी रक्कम देत भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला, परंतु नवरा अर्जुन सुदाम मुळाणे सासू हिराबाई, दिर प्रमोद हे वेळोवेळी, विविध कारणांनी मीनाक्षीचा शारीरिक व मानसिक छळ करीत मारहाण करीत होते. त्यामुळे त्यांच्या जाचास कंटाळून त्यांच्या शेततळ्यात मोठा मुलगा सिद्धेश अर्जुन मुळाणे वय ९, लहान मुलगा विराज अर्जुन मुळाणे वय ६ यांच्यासह उडी मारत आईने आत्महत्या केली असल्याबाबत फिर्याद दिंडोरी पोलीस ठाण्यात मिळालीय.
दरम्यान घटना समजताच मयत मीनाक्षी चे नातेवाईकांनी खतवड येथे धाव घेतली यावेळी तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी घटनास्थळी धाव घेत नातेवाईकांची समजूत घालत तणाव दूर केला. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केली. कोणताही अनर्थ घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.
न्यूज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे