प्रज्ञा राज,न्यूज अनकट
संतोष देशमुख प्रकरण लांबतच चाललय अशातच एक महिलेच्या मृतदेहाचा संबंध या प्रकरणाशी जोडला गेला. धाराशीव जिल्ह्यातील कळंब शहरामध्ये 27 मार्च रोजी एका 39 वर्षीय महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला. या महिलेच्या मृत्यूबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात होते. संतोष देशमुख यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी ही महिला तयार असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. मात्र कळंबचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांनी हा दावा फेटाळला. या महिलेचा आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा काही संबंध नसल्याचं संजय पवार यांनी म्हटलं.
पण नेमकं काय झालं होतं ? ती महिला कोण होती? तिची हत्या का झाली ? पाहूयात..


Manisha Bidves body related to Santosh Deshmukh case : 39 वर्षांची महिला धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब शहरात राहत होती. 27 मार्च रोजी परिसरातील लोकांना तिच्या घराकडून दुर्गंधी येत असल्याने त्यांनी पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता घराला कुलूप होतं. मग पोलिसांनी घराच्या मागच्या बाजूने खिडकीतून पाहिले असता घरात एका महिलेचा मृतदेह आढळला, तो सडलेल्या अवस्थेत होता.
या महिलेच्या डोक्याला मार लागल्याने घरात रक्त सांडलेलं होतं. या मृतदेहाची ओळख पटली.मनीषा बीडवे हिचा हा मृतदेह होता. त्यांनंतर या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली आणि पुढील तपास सुरू केला.पोलिसांनी मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला. तपासामध्ये सुरुवातीला उस्मान सय्यद याला ताब्यात घेतलं आणि त्याच्यामार्फत मुख्य आरोपी रामेश्वर भोसले याचा तपास सुरू केला.पुणे, आळंदी, मिरज, गोवा, कर्नाटक अशा वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांच्या पथकानं शोध घेतला. 1 एप्रिल रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, कळंब-येरमाळा रोडवरून पोलिसांनी या महिलेच्या मारेकऱ्यांना म्हणजेच रामेश्वर माधव भोसले (32) आणि त्याचा मित्र उस्मान सय्यद या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
कळंब शहरात ही महिला मागील काही वर्षांपासून एकटी राहत होती. परिसरातील लोकांचा आणि फारसा काही सबंध नव्हता. ती खासगी सावकारकी करायची. केज तालुक्यातील टाकळी येथील रामेश्वर माधव भोसले हा तिच्याकडे कामाला होता. यादरम्यान दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले. नंतरच्या काळात ती त्याचा मानसिक आणि शारीरिक छळ करायला लागली. त्याच्यासोबत सबंध ठेवलेले फोटो आणि व्हीडिओ दाखवून ती त्याला ब्लॅकमेल करत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांनी दिली.रामेश्वरला मारहाण करणे, निर्वस्त्र करून छळ करणे, घरात कोंडून ठेवणे, 5 लाख रुपये दे अन्यथा केस करेल अशी धमकी देणे, असा छळ ही महिला रामेश्वरसोबत करायची. तिने यापूर्वी काही लोकांवर बलात्काराचा गुन्हा देखील केला होता, असंही संजय पवार म्हणाले.
घटनेच्या दिवशी महिलेने रामेश्वरला मारहाण करून 100 उठाबशा काढायला लावल्या. हा सगळा छळ असह्य झाल्याने त्याने हातोडीने तिच्यावर हल्ला केला आणि त्यात तिचा मृत्यू झाला. त्याने कुठलीही पूर्वप्लॅनिंग न करता हा खून केल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांनी सांगितले. आरोपींनी कबुली जबाबात महिलेकडून होणाऱ्या छळाला कंटाळून तिचा खून केल्याचं म्हटल आहे.


आरोपी रामेश्वरने संबंधित महिलेचा खून केल्यानंतर दोन दिवस तिच्याच घरात थांबला. इतकेच नव्हे तर त्या काळात त्याने त्याच घरात जेवणही केले. तिसऱ्या दिवशी मृतदेहातून दुर्गंधी येऊ लागल्यामुळे रामेश्वरने त्या महिलेचीच गाडी घेतली आणि तेथून पलायन केले. या घटनेची माहिती त्याने केज येथील आपल्या मित्राला, उस्मान सय्यद याला दिली. उस्मान सय्यद याने त्याला पळून जाण्यास मदत केली आणि मृतदेहाची विल्हेवाट कशी लावावी, याबाबत सांगितल, असे रामेश्वरने पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात नमूद केले आहे.
घराबाहेर पडताना रामेश्वरने संबंधित महिलेचा मोबाईल सोबत घेतला, जेणेकरून त्यातील फोटो आणि व्हिडीओ डिलीट करता येतील. नंतर त्याने तो मोबाईल विकून पुढील प्रवासासाठी पैसे मिळवले. तो कळंब येथून पुणे, आळंदी, कर्नाटक, गोवा अशा विविध ठिकाणी फिरत राहिला. त्या महिलेच्या सततच्या त्रासामुळे आणि ब्लॅकमेल करून पैसे मागण्याच्या प्रकारामुळे आपण हे कृत्य केल्याचे रामेश्वरने कबूल केले, अशी माहिती पोलिस निरीक्षक संजय पवार यांनी दिली.
या प्रकरणात रामेश्वर माधव भोसले व उस्मान गुलाब सय्यद यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 249 व 239 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या प्रकरण न्यायालयात असून मोबाइल सिडिआर तपासणी सुरू आहे..