महिला टी -२० वर्ल्डकप : सेमीफायनलपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; गोलंदाज पूजा वस्त्राकर बाहेर

नवी दिल्ली, २३ फेब्रुवारी २०२३ : आयसीसी महिला टी -२० वर्ल्डकप स्पर्धेचा सेमीफायनलचा सामना आज संध्याकाळी पार पडणार आहे. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने येणार असून, हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण हा सामना जिंकणाऱ्या संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळणार आहे. दरम्यान या महत्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. गोलंदाज पूजा वस्त्राकर या सामन्यातून बाहेर पडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा वस्त्राकर आजारी असल्याने या सामन्यातून बाहेर पडली आहे. पूजा वस्त्राकर जागी स्नेह राणाचा संघात समावेश करण्यात आला आहे. तर संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आजारी असल्यामुळे ती खेळणार की नाही याबाबत अजूनही संभ्रम आहे. हरमनप्रीत कौर न खेळल्यास स्मृती मानधना नेतृत्व करताना दिसेल.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया सलग तिसरा टी – २० विश्वचषक जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत. तर हरमनप्रीतच्या जागी हरलीन देओलचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. हरमनप्रीतने चार सामन्यांत केवळ ६६ धावाच केल्या आहेत, परंतु महत्त्वाच्या सामन्यात तिचे असणे प्रतिस्पर्धीवर दडपण निर्माण करण्यासारखे आहे. तर दुसरीकडे पूजा वस्त्राकरने आतापर्यंत या स्पर्धेत दोन बळी घेतले आहेत.

पूजा वस्त्राकर जागी संधी मिळालेल्या स्नेह राणा ने टी -२० क्रिकेटमध्ये एकूण २४ सामने खेळले असून तिने २४ बळी घेतले आहेत. या दरम्यान तिने ६५ धावा देखील केल्या आहेत. तर आतापर्यंत दोन टी -२० मालिकेत दोनवेळा सेमी फायनल सामने खेळले असून त्यात ३ बळी घेतले आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा