गोल पोस्ट महाराष्ट्र मेडिकल कॉलेजचे डीन येत नाहीत तोवर जिल्हा रुग्णालयातून हलणार नाही – आमदार...

मेडिकल कॉलेजचे डीन येत नाहीत तोवर जिल्हा रुग्णालयातून हलणार नाही – आमदार डॉ.राजन साळवी

रत्नागिरी, १७ जानेवारी २०२४ : रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये अपघात विभागात तब्बल चार तासाहून अधिक काळ डॉक्टर उपलब्ध नसल्याची तक्रार शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आणि उपनेते डॉ. राजन साळवी यांच्याकडे रुग्णांच्या नातेवाईकांनी केली. त्यानंतर मध्यरात्री १२ वाजता आमदार डॉ राजन साळवी यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये धाव घेत प्रत्यक्ष पाहणी करून सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ‘मेडिकल कॉलेजचे डीन येत नाहीत तोवर जिल्हा रुग्णालयातून हलणार नाही’, अशी आक्रमक भूमिका आमदार डॉ. राजन साळवी यांनी घेतली. मेडिकल कॉलेजचे डीन जिल्हा रुग्णालयामध्ये तातडीने दाखल झाले. यावेळी आमदार डॉ. राजन साळवी यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. ही परिस्थिती गंभीर असून यामध्ये रुग्णांचे हाल होता कामा नये अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखवत डीन यांना चांगलच धारेवर धरल.

जिल्हा रुग्णालयामध्ये ग्रामीण आणि दुर्गम भागातून रुग्ण येत असतात. अशा वेळेला डॉक्टर उपलब्ध नसतील, तर रुग्णांनी नेमकं करायचं तरी काय? असा सवाल आमदार डॉ. राजन साळवी यांनी यावेळी उपस्थित असलेल्या जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना केला. शिवाय आपण स्वतः यामध्ये लक्ष घालणार असून राज्य शासनाला याबाबत भूमिका घेण्यास भाग पाडू, असा पवित्रा सध्या आमदार डॉ. राजन साळवी यांनी घेतला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी – केतन पिळलकर

error: Content is protected !!
Exit mobile version