उस्मानाबाद, ८ ऑगस्ट २०२०: उस्मानाबाद जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाकडे पाहता त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन वेळोवेळी प्रयत्न करत आहे. कोरोनाच्या उपाययोजनांच्या अनुषंगाने महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज दिनांक ८ ऑगस्ट रोजी तुळजापूर येथे बैठक घेतली.
या बैठकीत चर्चा केल्यानंतर त्यांनी टेस्टींग, ट्रेसींग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्री वर काम करा अशा सूचना दिल्या. यासोबतच, उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना विषाणू वर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रदेश कार्याध्यक्ष मा. बसवराज पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी विविध प्रकारच्या सूचना या बैठकीत मांडल्या.
महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी घेतलेल्या या आढावा बैठकीत वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, महिला व बालविकास मंत्री ना. यशोमती ठाकूर, प्रदेश कार्याध्यक्ष मा. बसवराज पाटील, माजी मंत्री मा. मधुकरराव चव्हाण, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. डॉ. कोलते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे आदी उपस्थित होते.
न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड