श्रमिकांच्या हक्कांसाठी पुण्यात काल श्रमिक हक्क निदर्शने

पुणे, दि. ४ जुलै २०२०: कोरोनाच्या संकट काळात देशामध्ये लॉकडाऊन लागल्यापासून देशातील गरीब, कष्टकरी जनतेचे प्रचंड हाल या तीन महिन्यांत झाले आहे. लोकांना हाताला काम उरलेले नाही, लोकांना रेशन मिळाले नाही, लोकांना आरोग्य सुविधा वेळेवर मिळाली नाही. अशा सर्व श्रमिक हक्कांसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे व ह्या मागण्या मान्य करण्यासाठी काल पुण्यातील सेनापती बापट पुतळा अलका टॉकीज चौक येथे ‘श्रमिक हक्क निदर्शने’ करण्यात आली. यावेळी जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय, नवसमाजवादी पर्याय, राष्ट्रसेवा दल, इनक्रेडीबल समाजसेवक ग्रुप, युवक क्रांती दल व समविचारी संघटनांमधील कार्यकर्ते उपस्थित होते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सर्व नियमांचे पालन करत हे आंदोलन काल पार पडले.

या वेळी खालील मागण्या आंदोलनकर्त्यांनी मांडल्या:-

• कामगार कायद्यातील कामगार विरोधी बदल तातडीने मागे घ्या.
• ज्यांचे रोजगार नष्ट झाले आहेत अशा प्रत्येकाला रोजगार मिळवून द्या.
• रेशनवर पुढील ६ महिने प्रत्येक गरजू व्यक्तीला (रेशन कार्ड असो किंवा नसो) १५ किलो मोफत धान्य मिळाले पाहिजे. गहू, तांदळाबरोबरच डाळी, कडधान्य, तेल, साखर या वस्तूही दिल्या पाहिजेत.
• प्रत्येक गरजू कुटुंबाला सन्मानाने जगण्यासाठी महिना ७५०० रुपये पुढील ६ महिन्यासाठी द्यावेत.
• खासगीकरणाचे धोरण रद्द करा. सार्वजनिक उद्योग बळकट करा.
• अतिश्रीमंतावर २% संपत्ती कर लावा.
• आशा, अंगणवाडी सेविका, नर्सेस व एकूणच सर्व आघाड्यांवरील आरोग्य कर्मचार्‍यांना सुरक्षेची साधने व योग्य वेतन द्या.
• कृषी क्षेत्र नफेखोरी कॉर्पोरेट भांडवलास खुले करणारे ३ शासकीय अध्यादेश तातडीने रद्द करा.
• कोळसा खाण कामगारांच्या २ त्ते ४ जुलै दरम्यानच्या संपास जाहीर पाठिंबा.
• पर्यावरण संरक्षण कायद्यातील घातक बदल तातडीने रद्द करा.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा