पुणे दि.३० एप्रिल २०२० : लॉकडाऊनमुळे राज्यात व राज्याबाहेर अडकलेल्या स्थलांतरित कामगार, यात्रेकरु, विद्यार्थी, तसेच इतर नागरिकांनी त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी राज्य शासनाने कार्यपध्दती निश्चित केली आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात येत आहे. तथापी स्थलांतरणासाठी इच्छूकांनी जाण्यासाठी घाई करु नये, तसेच घाबरुन जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.
सद्यस्थितीत कुठल्याही बसेस अथवा रेल्वे सुरु करण्यात येणार नाहीत. त्यामुळे कामगार व नागरिकांनी कुठल्याही अफवेला बळी पडू नये. तसेच घराबाहेर न पडता आहे त्या ठिकाणीच सुरक्षित राहावे. जिल्ह्यात अडकलेल्या कामगारांची व व्यक्तींची प्रशासनाच्या वतीने माहिती घेऊन स्थलांतरणासाठी इच्छुकांची यादी तयार करण्यात येणार आहे. हे कामगार ज्या राज्यात जाण्यासाठी इच्छूक आहेत. त्या राज्याशी राज्य शासनामार्फत संपर्क साधून त्यांना संबंधित राज्याची परवानगी मिळाल्यानंतर ही प्रक्रिया सुरु होणार आहे.
जिल्हाधिकारी यांच्या परवानगीचे पत्र असेल तरच अडकलेल्या नागरिकांना स्थलांतर करण्याची परवानगी दिली जाणार आहे. यानंतर या नागरिकांची आरोग्य तपासणी केली जाईल. त्यानंतरच स्थलांतरणाची कार्यवाही सुरु केली जाईल. कामगारांच्या सर्व तक्रारींच्या निराकरणासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने २४ तास नियंत्रण कक्ष सुरु करण्यात आला आहे. तक्रार असल्यास दुरध्वनी क्र.०२०-२६१११०६१ अथवा ०२०-२६१२३३७१अथवा १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच dcegspune1@gmail.com व controlroompune@gmail.com या संकेतस्थळावर तक्रारी स्विकारल्या जातील. याशिवाय तालुका नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राम यांनी दिली.
न्युज अनकट प्रतिनिधी: प्रशांत श्रीमंदिलकर