आज जागतिक चहा दिन…. चौकामध्ये कुठेतरी एक टपरी, त्यावर रॉकेलचा स्टोव्ह, त्यावर एक चहाची किटली हीच काय ती चहाच्या दुकानांची पूर्वीची ओळख. मात्र जसजशी हॉटेल संस्कृती हायटेक रूप धारण करू लागली तशी चहाची दुकानेही बदलू लागली.
जगभर प्रिय असलेल्या चहाचे सेलिब्रेशन व्हावे यासाठी 2005 पासून 15 डिसेंबर हा ‘जागतिक चहा दिवस’ म्हणून श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, व्हिएतनाम, केनिया, मलावी, मलेशिया, युगांडा, टांझानिया आणि भारतातही साजरा होतो.
आपल्यापैकी प्रत्येकाचा दिवस गरमागरम चहाने सुरू होतो. चहा घेतल्याशिवाय अनेकांना ताजेतवाने वाटत नाही. चहा घेतल्यानंतर पुढचा दिनक्रम व्यवस्थित सुरू होतो, अशी अनेकांची भावना असते.
सकाळी चहा घेतल्यानंतर दिवसातून किमान तीन-चार वेळा तरी या ना त्या निमित्ताने आपण चहा घेत असतो. झोप आली, कंटाळा आला, यासारखी कारणे चहा घेण्यासाठी दिली जातात. पाण्यानंतर जगात सर्वात जास्त प्यायलं जाणारं एकमेव पेय म्हणजे चहा….