नवी दिल्ली, २४ ऑगस्ट २०२३ : भारतीय कुस्तीपटूंसाठी एक वाईट बातमी आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व निलंबित केले आहे. भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक न झाल्यामुळे युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने हा निर्णय घेतला आहे. या बाबत युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने ३० मे रोजी भारतीय कुस्ती महासंघाला पत्र लिहिलेले. ४५ दिवसांत (१५ जुलैपर्यंत) भारतीय कुस्ती महासंघाची निवड न झाल्यास युनायटेड वर्ल्ड रेसलिंग भारतीय कुस्ती महासंघाचे सदस्यत्व निलंबित करेल, असे या पत्रात लिहिले होते.
गेल्या काही महिन्यांपासून भारतीय कुस्तीमध्ये दंगल सुरू आहे. विनेश फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांच्यासह अनेक कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. यानंतर क्रीडा मंत्रालयाने फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना निलंबित केले. तेव्हापासून महासंघाचे काम तदर्थ समिती हाताळत होती. जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश एमएम कुमार यांची, कुस्ती महासंघाच्या नव्या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका याआधी ११ जुलै रोजी होणार होत्या. पण, त्यानंतर आसाम कुस्ती संघटनेने मान्यता मिळवून न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर आसाम उच्च न्यायालयाने निवडणुकीला स्थगिती दिली होती. यानंतर निवडणूक अधिकारी एमएम कुमार यांनी दुसऱ्यांदा भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीची तारीख १२ ऑगस्ट निश्चित केली. पण, निवडणुकीच्या एक दिवस आधी पंजाब- हरियाणा उच्च न्यायालयाने मतदानाच्या एक दिवस आधी निवडणुकीला स्थगिती दिली होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड