यशवंतराव चव्हाण पुण्यतिथी विशेष

यशवंत महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या आज ३५ वी पुण्यतिथी आहे. महाराष्ट्राचे शिल्पकार, थोर नेते श्री. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी झाला. सातारा जिल्‍ह्यातील देवराष्ट्र हे एक हजार वस्तीचे खेडे त्‍यांचे जन्‍मस्‍थान. त्यांचे वडील यशवंतराव लहान असतानाच वारले. त्यांच्या आई विठाबाई, त्यांचे बंधू ज्ञानदेव यांनी कष्ट करून घर चालवले. यशवंतराव या पुत्राने खूप शिकावे ही त्या माऊलीची इच्छा. 
कै. यशवंतराव चव्हाणांनी प्रसंगानुरूप केलेली व्याख्याने आणि लिहिलेले लेख बहुतांशी ग्रंथबध्द झालेले आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्तवाचा आणि विचारांचा ज्यांना खोलवर अभ्यास करावयाचा असेल त्यांनी मुळात त्यांचे पुस्तक वाचणे श्रेयस्कर ठरेल. राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विषयांसंबधी यशवंतरावांनी वेळोवेळी प्रगट केलेल्या विचारंच्या  अथांग सागरातून मौलिक मोती आजच्या तरुणाला व नेतेमंडळींना शोधता आले पाहिजे. त्यांनी सालसेत असताना सत्याग्रहात भाग घेतला म्हणून त्यांना अठरा महिन्यांची शिक्षा झाली. ते येरवडा तुरुंगात असताना आचार्य भागवत, एस.एम. जोशी यांच्यासारखे नेते तेथे होते. तुरुंगामध्ये राजकीय, सामाजिक विषयांवर चर्चा होत. यशवंतरावांना त्या वयातच विचारवंत, साहित्यिक यांच्या ग्रंथांसंबंधी आकर्षण वाटू लागले होते. व्यक्ती, विचार, राजकीय व सामाजिक प्रश्नांविषयीच्या कल्पना अशा बाबतींत यशवंतरावांचे मन स्वागतशील असल्यामुळे त्यांची वृत्ती सर्वसमावेशक झाली होती. ते माध्यमिक शाळेत असताना राजकीय जागृती होऊ लागली होती. सातारा जिल्हा हा राजकीयदृष्ट्या पूवीर्पासून जागृत असल्याचाही परिणाम त्यांच्यावर झाला होता.
कारावासातून सुटून आल्यावर शालेय अभ्यासक्रम पुरा करत असतानाच राजकीय हालचालीत यशवंतरावांनी खंड पडू दिला नाही. ते कोल्हापुरात राजाराम महाविद्यालयात शिकत असतानाही सातारा जिल्ह्यातील राजकीय हालचाली, चर्चा इत्यादींच्या संपर्कात होते. तेव्हा केवळ त्यांच्याच नव्हे तर इतर जिल्ह्यांतही दोन प्रकारचे परिवर्तन होत होते. एक म्हणजे तरुण वर्ग काँग्रेसच्या राजकारणात येत होता तर दुसरीकडे बहुजनसमाजही तिकडेच वळत होता व नवे कार्यकतेर् पुढे येत होते. समृद्ध महाराष्ट्राचे द्रष्टे शिल्पकार म्हणून यशवंतराव चव्हाण यांचे व्यक्तिमत्त्व अभ्यासताना त्यांचे शिक्षणविषयक विचार आजच्या स्पर्धात्मक युगातही किती परिणामकारक ठरतात आणि त्यांच्या विचारांची आजही किती गरज आहे, हे लक्षात येते. महात्मा जोतिबा फुले आणि थोरले बंधू गणपतराव यांच्या सामाजिक व आर्थिक विषमता दूर करण्याच्या कार्यामुळे त्यांना एक नवी दृष्टी प्राप्त झाली होती. देवराष्ट्रे गावात राहून त्यांनी विषमतेबरोबरच शेतक-यांची दु:खे जाणली होती. त्यातूनच शिक्षणाची गरज आणि महत्त्वही लक्षात घेतले होते. शेतक-याची पुढची पिढी ही शिकती पिढीच असली पाहिजे आणि शिक्षण हे तळागाळातल्या प्रत्येकाला मिळाले पाहिजे, याकरिता ते आग्रही होते. त्यांच्या दूरदृष्टिकोनातूनच सैनिक स्कूल, शिवाजी विद्यापीठ आणि मराठवाडा विद्यापीठाची निर्मिती झालेली आहे.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत १९४० मध्ये चव्हाण साहेबांनी स्वतःला राजकारणामध्ये झोतून घेतलं. १९४२ मध्ये त्यांचा वेणू ताईंशी विवाह झाला. त्याच वर्षी सातारा जिल्ह्यातील चळवळीत प्रवेश करत ते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाले. वैचारिक ज्ञानाची शिदोरी सोबत घेऊन यशवंतराव १९४६ मध्ये मुंबई विधानसभेवर निवडून आले. निवडून आल्यानंतर ते पार्लमेंटरी सेक्रेटरी झाले. १९५२ ते १९५५ या काळात मंत्री म्हणून त्यांनी विविध खात्यांची धुरा सांभाळली. यानंतर १ नोव्हेंबर १९५६ साली द्विभाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर १ मे १०६० रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यावर ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. १९५६ ते १९६२ या सहा वर्षांच्या काळात संयुक्त महाराष्ट्राचा विकास हाच यशवंतराव चव्हाण यांच्या मनातील ध्यास होता. या काळात त्यांनी समाजहिताचे अनेक कायदे केले. कृषी, सिंचन, सहकार, औद्योगिक या कामांच्या विकासावर त्यांनी भर दिला. महाराष्ट्र राज्याला नवीन दिशा दिली. ग्रामीण विकास असो किंवा शिक्षणाचा विस्तृत पाया यशवंतराव चव्हाण कुठे कमी पडले नाही.
त्यांनी मांडलेल्या प्रत्येक विचार, त्यांनी टाकलेले प्रत्येक पाऊल हा एक सर्वांगीण विकासाचा आदेश ठरला. त्यांच्या नेतृत्वाने आणि प्रभावाने अनेक सहकारी संस्था उभ्या राहिल्या. १ मे १९६२ रोजी जिल्हापरिषद आणि पंचायत समित्यांची निर्मिती करून राज्य वीकरणी करणाचे एका ऐतिहासिक पाऊल त्यांनी टाकले आणि तेच धोरण देशांनीही स्वीकारले. १९६२ मध्ये हिमालयाच्या रक्षणासाठी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची हाक आल्यावर देशाचे संरक्षणमंत्री म्हणून ते दिल्लीला गेले. देशाचे संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री, परराष्ट्र खात्याचे मंत्री आणि उपपंतप्रधान अशा सर्वोच्च स्थानांवर काम केलेले हे यशवंतराव चव्हाण होते याचे विस्मरण अवघ्या महाराष्ट्राला कधीही पडणार नाही.
अशोकराव चव्हाण हे अभ्यासू, विचार वंत, लोकशाहीवादी, मानवतावादी, व्यापक दृष्टिकोनाचे मुस्तदी राष्ट्रीय आणि जागतिक राजकारणाचा सखोल अभ्यास केलेले जनमानसातील कर्तृत्ववान नेते होते. तरुण नेत्यांची आजची फळी महाराष्ट्राला त्यांच्या च विचारांनी पुढे नेत आहे. महाराष्ट्राला एक पुरोगामी राज्य म्हणून नावारूपाला आणणाऱ्या चव्हाण साहेबांनी देशाच्या सेवेत महाराष्ट्र कुठेही कमी पडू दिला नाही. राष्ट्र सेवेत महाराष्ट्राचा वाटा हा सिंहाचा वाटा असेल हे आपल्या कृतीतून त्यांनी दाखवून दिले. त्यांनी महाराष्ट्राला यशवंत आणि देशाला कीर्तिवंत केले आहे. म्हणूनच महाराष्ट्रातला किंबहुना संपूर्ण देशातला कोणताही माणूस या नेत्याचे ऋण कधीही विसरत नाही.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा