हवामान विभागाकडून पुढील पाच दिवस राज्यातील काही ठिकाणी यलो-अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज-अलर्ट

पुणे २४ जून २०२३: मान्सूनच्या आगमनासाठी लोक आभाळाकडे डोळे लावून बसले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून प्रतिक्षेत असणारा मान्सून राज्यातील अनेक भागांत दाखल झालाय. विदर्भात मान्सूनचे आगमन झाले. बिपरजॉय चक्रीवादळाने थांबवलेला मान्सूनचा प्रवास पुन्हा सुरु झाला. कालपासून (२३ जून) राज्यातील अनेक भागांत मान्सून सक्रीय झाला आहे. त्यानंतर आजही (२४ जून) अनेक ठिकाणी पाऊस पडला आहे. मुंबई, पुणे आणि कोकणात पाऊस सुरु असला तरी राज्यात अजून कोठेही मोठा पाऊस झालेला नाही. आता भारतीय हवामान विभागाने पावसाचा सकारात्मक अहवाल देताना पुढील पाच दिवसांसाठी काही ठिकाणी यलो तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला आहे.

राज्यात पुढचे पाच दिवस मान्सून बहुतांश भागात सक्रिय राहणार आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख के.एस.होसळीकर यांनी टि्वट करुन दिली. पुढील पाच दिवसांत कोकण आणि विदर्भात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस असणार आहे. पुणे, सातारा, नाशिकमध्येही मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्येही पावसाचा जोर राहिल. यामुळे शेतकरी वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. पाऊस पडत आहे, परंतु शेतकरी वर्गाने अजूनही पेरणी करण्याची घाई करु नये. जमिनीतील ओल पाहून पेरणी बाबत निर्णय घ्यावा, असे तज्ज्ञांनी सांगितले.

पावसाचे माहेरघर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीला, ७ जूनच्या आसपास दरवर्षी पाऊस दमदार हजेरी लावतो. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने ही परंपरा यंदा खंडीत झाली. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आज इगतपुरी शहरासह परिसरात वरुण राजाने दमदार हजेरी लावली आहे. येथे संततधार पाऊस सुरू असून पावसाच्या आगमनामुळे बळीराजा सुखावला. राज्यातील नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. रत्नागिरीतही पावसाची दमदार एंट्री शनिवारी झाली. यामुळे शेतकऱ्यांसमोरील दुबार पेरणीचे संकट टळले आहे. चिपळूण, गुहागर, खेड, मंडणगड, दापोलीसह जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या असून कोकणातील वातावरण पाऊसमय झाले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी- अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा