येवले चहामध्ये भेसळ ; एफडीएच्या अहवालातून सिद्ध

पुणे: पुण्यामध्ये अल्पावधीत नावारूपाला आलेला सुप्रसिद्ध येवले चहा पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) अहवालात येवले चहामध्ये भेसळ असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे येवले चहाच्या विक्री संदर्भात अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत.

एफडीएने येवले फूड प्रॉडक्टची तपासणी केली असता चहामध्ये रंग टाकण्यात येत असल्याची माहिती अहवालातून समोर आली आहे. पहिल्या अहवालात कोणतीही भेसळ नसल्याचे सिद्ध झाले होते. परंतु दुसऱ्या अहवालात या अहवालात सिंथेटिक फूड कलर आढळून आला आहे. त्यामुळे चहाला लाल कलर येतो. केंद्रीय प्रयोग शाळेने हा अहवाल दिल्यामुळे येवले चहा पुन्हा अडचणीत आला आहे.

अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत रंगाचा वापर करणे चुकीचे आहे. काही महिन्यांपूर्वी एफडीएने कोंढव्यातील येवले फूड प्रॉडक्ट येथे तपासणी करत असताना चहा पावडर, साखर, चहा मसाला यांचे नमुने आणि सहा लाख रुपयांचा साठा संशयावरुन जप्त केला होता. तसेच, अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. चहा पावडर बनवण्यासाठी मेलानाईटचा वापर केला जात असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली होती.

तपासात पाठवलेल्या नमुन्यांचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार होती. त्यानुसार येवले चहाचे कोंढव्यातील उत्पादन केंद्र बंद ठेवण्याचे आदेश अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए) कडून देण्यात आले होते. कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी, पॅकबंद मालावर कोणती माहिती नसणे अशा विविध नियमांचे उल्लंघन केल्याने पुढील आदेश येईपर्यंत उत्पादन केंद्र बंद ठेवण्याचे आदेश एफडीएचे सहआयुक्त एस. एस. देशमुख यांनी दिले होते. तसेच येवले कडून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या जाहिरातीतील येवले चहा प्यायल्यावर पित्त होत नाही, चहासाठी मिनरल वॉटर वापरले जाते हे दावे खोटे असल्याचे एफडीएने म्हटले होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा