पिशोर, छत्रपती संभाजीनगर, ५ एप्रिल २०२४ : पिशोर पोलीस ठाणे हद्दीतील नादरपुर येथील ३२ वर्षीय तरुण गणेश पुंडलिक निकम याने २२ मार्चला त्याच्या शेतात निंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली होती. सदर तरुणाने ही आत्महत्या आर्थिक विवंचनेतून केली असे त्याच्या घरच्यांना वाटले होते. परंतु त्याच्या नातेवाईकांना त्याच्या कपड्यात त्यांनी लिहुन ठेवली चिठ्ठी सापडली. त्या चिठ्ठी वरून सदर तरुणाचा आठ दिवसापूर्वी अपघात झाला नसून त्याला त्याचा वाहन मालक विलास आग्रे व राजु आग्रे यांनी जबर मारहाण केली असल्याचे उघड झाले.
सदर तरुणाने मारहाण झाल्याचे घरात सांगितले नसून अपघात झाल्याचे सांगितले होते. मात्र त्यास त्याचा वाहन मालक विलास आग्रे व राजु आग्रे यांनी काही इसमा समक्ष जबर मारहाण करून जखमी केले होते. कुणाला काही सांगितल्यावर त्याचे परिणाम वाईट होईल असा दमही त्यास भरला असल्याने त्याने कुणाला काहीच सांगितले नाही. मात्र त्याने त्याचे दुःख त्याच्या चिठ्ठीत व्यक्त केले होते. मला डोंगरगाव आग्रे येथील वाहन मालक विलास आग्रे व राजु आग्रे यांनी काही इसमा समक्ष जबर मारहाण केली होती. तेच माझ्या मृत्यूस कारणीभूत आहे असे निकम यांनी चिठ्ठीत लिहले होते.
चिठ्ठीमुळे गणेश यांच्या मृत्यूचे गुढ उकलले असून पिशोर पोलीस ठाणे येथे तरुणाच्या आत्महत्येनंतर अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र चिठ्ठी मिळाल्यानंतर नातेवाईकांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर पिशोर पोलीसांनी तांत्रिक बाबी तपासून अरोपी विलास दौलत आग्रे व राजु नाना आग्रे रा. डोंगरगाव आग्रे, ता. कन्नड यांच्या विरुद्ध भा. द. वि. ३०६, ३२४ , ५०४, ५०६, २४ कलमान्वे गुन्हा दाखल केला आहे. पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तट्टू पाटील आणि भिवसने हे करीत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : मिलिंद कुमार लांडगे