मुंबई, १४ फेब्रुवरी २०२१: बीड येथील पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ७ फेब्रुवारी रोजी पुण्यात मूळची बीड जिल्ह्यातील असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने आत्महत्या केली होती. भावासोबत पुण्यात स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी ती राहत होती. तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून तिने आत्महत्या केली. राज्यातील एका कथित मंत्र्याभोवती या तरुणीच्या आत्महत्येची संशयाची सूई निर्माण झाल्याने या प्रकरणावरून विरोधकही आक्रमक झाले आहेत.
या प्रकरणात महाविकास आघाडीतील सरकारमधील एका मंत्र्यांचे नाव चर्चेत आल्यानंतर सगळ्याचे कान घटनेच्या घडामोडींकडे लागल्याचे दिसत आहे.
हा विषय राजकीय वर्तुळात ज्वलंत बनत असल्याचे चित्र असून, या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी भाजपकडून होत आहे.
याप्रकरणी वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांना राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी बोलवून घेतले. पूजा चव्हाणचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला असून, तिचा मृत्यू कशामुळे झाला? याचे कारण समोर आले आहे. डोक्याला मार लागून पूजा चव्हाण या तरुणीचा मृत्यू झाल्याचा उल्लेख पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये असल्याचे दीपक लगड यांनी हेमंत नगराळे यांना सांगितले आहे.
या प्रकरणाच्या ११ कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. कथित मंत्री आणि त्याच्या कार्यकर्त्याच्या संभाषणाच्या या क्लिप्स आहेत. अरूण राठोड असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. तसेच तो या मुलीचा चुलत भाऊ असल्याचेही त्या कार्यकर्त्याच्या बोलण्यातून स्पष्ट होते. पूजाच्या आत्महत्येपूर्वीपासून ते आत्महत्येनंतरचं संभाषण या क्लिपमध्ये आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे