मराठा आरक्षणासाठी धाराशिवमधील दहिफळ गावच्या तरुणाने चिठ्ठी लिहून केली आत्महत्या

धाराशिव ६ जानेवारी २०२४ : मराठा आरक्षणसाठी धाराशिव जिल्हयात पुन्हा एकदा १९ वर्षीय तरुणाने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे. कळंब तालुक्यातील दहिफळ येथे रोहन राजेंद्र भातलवंडे या १९ वर्षाच्या तरुणाने चिठ्ठी लिहून मराठा आरक्षणसाठी शेतातील बांधावर असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केली आहे.

दहिफळ येथील १९ वर्षीय रोहण राजेंद्र भातलवंडे याचे १० वी पर्यंत शिक्षण झाले असून त्याने कृषी पदविका डिप्लोमा कोर्स केला आहे. नोकरीच्या शोधात फिरला परंतु कुठे नोकरीची संधी मिळाली नाही. त्याने दहिफळ गावात दुधडेअरीचा व्यवसाय सुरू केला. दुधाचा व्यवसाय चालवत असताना स्वःताच्या तीन गायी सांभाळत होता. आपण कृषी पदविका शिक्षण घेऊन काय फायदा झाला. कुठे नोकरीची संधी उपलब्ध होत नाही. जर आरक्षण असते तर कुठे तरी संधी मिळाली असती अशा विचारात तो एकांतात वावरत होता.

दहिफळ येथे दि ३ जानेवारी रोजी मराठा आरक्षणासाठी बैठक घेण्यात आली होती. आरक्षण मिळवण्यासाठी मनोज जरांगे पाटील जीवाची बाजी लावत आहेत.अखेरची लढाई सुरू असुन सरकारने लवकर आरक्षण जाहीर करावे यासाठी दबाव वाढत आहे. आंदोलने होत आहेत. सकल मराठा समाज एकवटला असुन आझाद मैदानावर २० जानेवारी रोजी जरांगे पाटील उपोषणाला बसणार आहेत. त्यांच्या पायी दिंडीत सहभागी होण्यासाठी गावात बैठक घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व तयारी झाली असतानाच बैठकीच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळी हि दुःखद घटना घडली आहे.

एकीकडे आरक्षणासाठी जोरदार आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे युवक हताश होऊन गळफास घेऊन आत्महत्या करत आहेत. सरकारचे हे अपयश असुन तरुणांना पुरक व्यवसायासाठी आर्थिक मदत देण्यास ते कमी पडले आहे. शिक्षण घेऊन सुशिक्षित बेकार म्हणून फिरावे लागत आहे. हताश होऊन अनेक तरुण युवक आपले जीवन संपवित आहेत. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. येरमाळा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल असुन पीएसआय विलास जाधव यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. भातलवंडे यांच्या शेतात रोहनवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावकरी नातेवाईक उपस्थित होते.

न्युज अनकट प्रतिनिधी : रहिम शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा