पुणे, दि.१२मे २०२०: लॉकडाऊन काळात घरी बसून पर्यावरण संवर्धन करण्यासाठी ‘पुणे प्लॉगर्स’ ने प्लॅस्टिक बँकेची सुरुवात केली होती. गेल्या ४५ दिवसांमध्ये आपापल्या घरी प्लॅस्टिक जमा करून ते काचर्या सोबत न मिसळता त्याचे वर्गीकरण करून साठवून ठेवले आहे. लॉकडाऊन संपताच ते प्लॅस्टिक पुनर्प्रक्रियेसाठी देऊन प्लॅस्टिकपासून होणारे प्रदूषण कमी करण्याचा हा छोटासा प्रयत्न या माध्यमातून केला आहे. अशी माहिती “पुणे प्लॉगर्सचे संस्थापक विवेक गुरव यांनी दिली आहे.
या वेळी गुरव म्हणाले की, या उपक्रमात आतापर्यंत १००हुन अधिक तरुण सहभागी झाले आहेत. त्यात घरातील कचर्याचे नियोजन करून ओला कचरा खत बनवण्यासाठी तर प्लॅस्टिक रिसायकल करायला पाठवत आहेत. अनेक प्लॅस्टिक वस्तूंपासून दागिने आणि शोच्या वस्तू देखील बनविल्या आणि प्लॅस्टिकचा पुनर्वापर झाला व तसेच तरुणांची कौशल्य देखील विकसित झाली.
कोरोनामुळे अनेक मोठ्या प्रमाणात मास्कचा वापर होत आहे. मात्र, हे मास्क वापरल्यानंतर तसेच कचर्यात टाकल्यामुळे संसर्ग वाढू शकतो. यासाठी कापडी मास्क वापरण्यावर भर देण्याचे देखील आवाहन या मार्फत केले गेले.
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय पातळीवर चित्रकला स्पर्धेचे आयोजन देखील पुणे प्लॉगर्सनी केले होते. ज्यात १५ देशांमधील ५० लोकांनी सहभाग घेऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. ही स्पर्धा ऑनलाइन घेऊन अनेक सोशल मीडिया हॅन्डल्सवर पृथ्वी वाचवा हा संदेश दिला गेला.
उन्हाळा आला की, झाडांना पाणी देणं महत्वाचा भाग बनतो. त्याचसाठी ‘एक वृक्ष एक मित्र’ या उपक्रमात आपल्या घरा भोवती असलेल्या झाडांना दत्तक घेऊन त्यांची काळजी घेण्याचं काम देखील सुरु आहे. अशा प्रकारे घरी बसून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे पर्यावरण रक्षण करण्याचा मानस “पुणे प्लॉगर्स” ने हाती घेतला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: