जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांला पाठविले थेट रुग्णालयात

पुणे २८ जून २०२३: पुणे जिल्हा परिषदेत विभागप्रमुखांची आढावा बैठक सुरू होती, तेंव्हा एक अधिकारी आले आणि तब्येत बरी नसल्याचे कारण देत लवकर जाण्याची परवानगी मागितली. तब्येतीकडे दुर्लक्ष करु नका असा सल्ला देत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्याला थेट रुग्णालयातच दाखल केले. प्रत्येक विभागाचा आठवड्यातील कामाच्या प्रगतीच्या आढावा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून घेतला जातो. मात्र या आढावा बैठकीला अनेकदा अधिकारी उशिरा येतात किंवा दांड्या मारतात.

झेड पी CEO नीं उशिरा येणाऱ्या अधिकाऱ्यांबद्दल नाराजी व्यक्त केली आणि न आलेल्यांना नोटीस देण्याच्या सुचना केल्या. बैठकीत एका अधिकाऱ्याने आजारी असल्याचे कारण देताच जिल्हा आरोग्य अधिकारी आणि अंगरक्षकाला संबंधित अधिकाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्याच्या सुचना CEO नीं केल्या. आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचीच सूचना म्हटल्यानंतर दोघांनीही सूचनेची तत्काळ अंमलबजावणी केली. खासगी रुग्णालयात जाऊन तपासणी केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांचा रक्तदाब वाढल्याचे आणि ताप आल्याचे निदर्शनास आले.

प्रत्येक विभागनिहाय बैठकीत आढावा घेताना कामांमध्ये प्रगती नसल्याने CEO प्रसाद यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. कामांची प्रगती का कमी आहे? याबद्दल अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देखील या वेळी देण्यात आल्या. प्रसाद हे महिन्याभराच्या प्रशिक्षणानंतर नुकतेच जिल्हा परिषदेत रुजू झाले. बैठकांना अनुपस्थित राहणाऱ्या अधिकाऱ्यांना यापूर्वी देखील नोटीसा देण्यात आल्या होत्या, असे त्यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी- अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा