यवतमाळ जिल्ह्यातील इंझाळा ग्रामपंचायतीला जिल्हा परिषद शिक्षक सुरेश कस्तुरेंनी विहिरीसह जमीन दिली दान

7

पुणे, २२ जानेवारी २०२३ : समाजात सकारात्मक बदल घडविणाऱ्यांमध्ये शिक्षणासोबतच शिक्षकांकडे बघितले जाते. यातूनच इंझाळा (ता. घाटंजी, जि. यवतमाळ) येथील एका जिल्हा परिषद शिक्षकाने संपूर्ण समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. यामुळे फक्त जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यभरातून शिक्षकाचे कौतुक होत आहे.

जिल्हा परिषद शिक्षक असलेल्या सुरेश कस्तुरे यांनी आपल्या गावातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची समस्या जाणून घेतली. आणि एक मोठा निर्णय घेतला. शिक्षक कस्तुरे यांच्या एका निर्णयाने संपूर्ण गावाचा प्रश्न सुटला आहे.

शिक्षक सुरेश कस्तुरे यांनी आपली जमीन इंझाळा ग्रामपंचायतीला दान दिली आहे. आपल्या गावातील लोकांना पिण्यासाठी दूरवरून पाणी आणावे लागत होते. त्यामुळे लोकांना होत असलेला त्रास पाहून शिक्षक सुरेश कस्तुरे यांनी मोठा निर्णय घेतला. कस्तुरे यांनी आपल्या शेतजमिनीवरील विहीर व मोटार पंपचे घर खोदकाम व बांधकामकरिता २५०० चौ. फूट जागा ग्रामपंचायत इंझाळा यांना दान दिली. शेतातील विहीर व जागेवर माझा यापुढे कोणताही अधिकार व हक्क राहणार नाही; तसेच वरील शेतावर माझ्याशिवाय इतर वारसांचा हक्क संबंध नाही. ते मी याआधी कोणास कोणत्याही प्रकारे गहाण, दान, बक्षीस करून दिले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तसे काही निघाल्यास त्यास मी जबाबदार राहीन; तसेच वरील विहीर व जागा ग्रामपंचायत इंझाळा यांना दान दिली असून, त्या विहीरीवर व दिलेल्या जागेवर माझा यापुढे कोणत्याही प्रकारे काहीही संबंध राहणार नाही व माझा हक्क संपुष्टात आला असून, मी यापुढे त्या विहीर व जागेबाबत कोणतीही तक्रार वा हरकत करणार नाही, असे दानपत्र शिक्षक कस्तुरे यांनी राजीखुशीने लिहून देऊन साक्षसमक्ष समजावून घेऊन व वाचून घेऊन त्यावर सही केली. ती मला व माझे संपत्ती वारसास लागू व बंधनकारक असल्याचेही दानपत्रात त्यांनी लिहून दिले आहे.

श्री. सुरेश कस्तुरे हे गेल्या ३५ वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी नऊ महिन्यांपूर्वी ३० फूट खोल विहीर खोदली होती. या विहिरीला भरपूर पाणी लागले. विहीर खोदण्यासाठी आणि तिचे बांधकाम करण्यासाठी एकूण ३ लाख खर्च आला. आता विहिरीसह तिच्या आजूबाजूची अडीच हजार स्केअर फूट जागाही त्यांनी गावासाठी दान दिली. आई-वडिलांच्या शिकवणीतून आपण हा एक प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षक सुरेश कस्तुरे यांच्या कार्यामुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्यातून सर्वत्र दानशूर शिक्षक श्री. सुरेश कस्तुरे यांचे कौतुक होत आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा