बुलढाणा, ६ ऑगस्ट २०२३ : माटरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत वर्ग पाच ते दहा आहेत. शाळेत १८ वर्गखोल्या आहेत. फक्त सहा शिक्षक काम करतात. शाळेला मोठे पटांगण आहे परंतु शाळेला संरक्षक भिंत नाही. त्यामुळे जनावर शाळेत येऊन घाण करतात. आजूबाजूच्या दहा ते बारा गावातील विद्यार्थी येथे शिकण्यासाठी येतात. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी डेक्स बेंच हवेत. मात्र, या शाळेतील बहुतेक डेक्स बेंच हे मोडलेले आहेत. शाळेत शौचालय नाही, प्रयोगशाळा नाही. गणित आणि विज्ञान या महत्त्वाच्या विषयाला येथे शिक्षक नाहीत. त्यामुळे पालक जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा करतात. शिक्षक द्या, अशी मागणी पालक करत आहेत. मात्र, जिल्हा परिषद प्रशासन त्यांना दाद देत नाही. २ ऑगस्ट रोजी पालकांनी विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषदेसमोर जाऊन आंदोलन केले. प्रशासनाने या आंदोलनाची दखल न घेता पालकांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले. त्यामुळे दाद कोणाकडे मागावी, असा प्रश्न निर्माण होत आहे.
माटरगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूल शाळेमध्ये गेल्या दोन वर्षापासून ८ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. रिक्त पदावर शिक्षकांची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी पालक आणि विद्यार्थी जिल्हा परिषदेसमोर २ ऑगस्ट रोजी गेले होते. यात पालक आणि शाळा समितीच्या अध्यक्षासह पदाधिकाऱ्यांवर जिल्हा परिषद प्रशासनाने गंभीर गुन्हे दाखल केले. त्याचा निषेध करण्यासाठी ग्रामस्थांचे वतीने शनिवारी माटरगाव बंदचे आवाहन करण्यात आले. यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांवर दाखल केलेले गुन्हे तत्काळ मागे घ्यावे. अन्यथा सोमवारपासून शाळा बंद ची भूमिका माटरगाव येथील ग्रामस्थांनी घेलली आहे.
माटरगाव येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. पाच ते दहापर्यंत वर्ग आहेत. परिसरातील बारा गावातील मुले याच शाळेत शिक्षणासाठी येतात. मात्र एवढ्या मोठ्या शाळेवर फक्त सध्या सहा शिक्षक कार्यरत आहेत. दहा शिक्षक कमी आहेत. यापैकी गणित आणि विज्ञान विषयाला शिक्षक नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. ज्या खोल्या आहेत त्यापैकी अनेक खोल्या पावसाळ्यात गळतात.
शाळेला संरक्षण भिंत नसल्याने मुलींच्या सुरक्षाचे प्रश्न निर्माण होत आहे. या संदर्भात पालक शिक्षकांच्या मागणीसाठी जिल्हा परिषदसमोर विद्यार्थी घेऊन आंदोलनासाठी गेले होते. मात्र प्रशासनाने पालकांवरच शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गंभीर गुन्हे दाखल केले. याचा संताप ग्रामस्थांमध्ये आहे. तत्काळ हे गुन्हे मागे घ्यावे, यासाठी गाव बंद करण्यात आले. येत्या सोमवारपासून शाळा बंद आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. त्यामुळे आता ग्रामस्थ आणि जिल्हा परिषद प्रशासन संघर्ष पाहायला मिळणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर