पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीसाठी तयार करण्यात येणाऱ्या प्रारूप मतदार यादीच्या प्रसिद्धीच्या तारखेत राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा बदल केला आहे. सुरुवातीला ६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणारी ही यादी आता नऊ दिवसांनी पुढे ढकलण्यात आली असून, १४ नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाईल.
महाविकास आघाडीसह विविध स्तरातून मतदार यादीतील त्रुटी, दुबार नावे आणि मृत मतदारांची नावे वगळण्याची मागणी जोर धरत होती. या मागणीसाठी राज्यभर आंदोलनेही करण्यात आली. अखेर, या मागणीची दखल घेत निवडणूक आयोगाने प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी आता १४ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार असून, त्यावर सूचना आणि हरकती दाखल करण्यासाठी मतदारांना २२ नोव्हेंबरपर्यंत (नऊ दिवस) मुदत मिळणार आहे. प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेतल्यानंतर, अंतिम मतदार यादी ६ डिसेंबरला प्रसिद्ध केली जाईल. यानंतर, मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी ८ डिसेंबरला आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी १२ डिसेंबरला जाहीर करण्याचा सूचना निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत.
या बदलामुळे महापालिका निवडणुकीच्या तयारीला वेगळी दिशा मिळाली असून, आता १४ नोव्हेंबरच्या प्रारूप यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सोनाली तांबे
