छत्रपती संभाजीनगर, ३ नोव्हेंबर २०२३ : केंद्र सरकारच्या पीएमई बस सेवा योजनेंतर्गत छत्रपती संभाजीनगर शहराला १०० इलेक्ट्रिक बसेस (१०० ई बसेस) मिळणार आहेत. ज्याचा नागरिकांना, कामगारांना आणि विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
महापालिका आयुक्त तथा प्रशासक जी.श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या या प्रकल्पांतर्गत स्मार्ट सिटीचा प्रस्ताव दिला होता. यामध्ये १०० इलेक्ट्रिक बसेसची मागणी प्रस्तावित करण्यात आली होती. भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत, सिटी बसचे मुख्य संचालन व्यवस्थापक संजय सुपेकर, नोडल अधिकारी हृषिकेश इंगळे आणि महाराष्ट्रातील इतर महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर या योजनेअंतर्गत देशभरातील १६९ शहरांची निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पीएमई बस सेवा योजनेअंतर्गत केंद्र सरकार शहरांसाठी बस खरेदी करणार आहे. यावेळी बसेसच्या चार्जिंगसाठी पायाभूत सुविधा व इतर बांधकामाचा खर्च देण्यात येईल, असे सांगण्यात आले.
स्मार्ट सिटी अंतर्गत जाधववाडीत ३०० बसेसची क्षमता असलेला डेपो उभारण्यात येत आहे. या बैठकीत बोलताना प्रशासक जी श्रीकांत यांनी शहरात आणखी एक डेपो सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. स्मार्ट सिटी सध्या १०० डिझेल बसच्या माध्यमातून शहर बससेवा चालवत आहे. याशिवाय ३५ इलेक्ट्रिक बसेसही लवकरच शहरात येणार आहेत. यानंतर शहराला आणखी १०० बसेस मिळणार आहेत. त्यामुळे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड