राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या पालखीचे आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते पूजन

अमरावती ३ नोव्हेंबर २०२३ : राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आज पालखी पदयात्रा काढण्यात आली होती. यावेळी आमदार यशोमती ठाकूर यांनी राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या पालखी पदयात्रेकरुंचे स्वागत करुन पालखीचे पुजन केले. या पालखीमध्ये विशेष करुन महिला भक्तांची संख्या जास्त होती. दिंडीत सहभागी झालेल्या महिलांनी टाळ-मृदूंगाच्या घोषात फुगडीचा फेर धरला. त्यावेळी आमदार यशोमती ठाकूर यांनी सुद्धा या महिला भक्तांसह झेंडा नाचवला तसेच फुगडीचा फेरही धरला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा भव्य पुण्यतिथी महोत्सव मोझरी-गुरुकुंज येथे दरवर्षी साजरा होतो. या पुण्यतिथी महोत्सवात राज्यातील विविध भागातून मोठ्या संख्येने गुरुदेवभक्त व पालख्या दाखल होत असतात. यावर्षी सुद्धा मोठया प्रमाणात पालख्या दाखल झाल्या. त्यानंतर गोपाल काल्याच्या दिवशी संपूर्ण गावातून पालखी पदयात्रा काढण्यात येते. प्रथेनुसार आज ३ नोव्हेंबर रोजी भल्या पाहटे गुरुकुंज येथून निघालेली पदयात्रा मोझरी गावात दाखल होताच, आमदार ॲड.यशोमती ठाकूर यांनी असंख्य गुरुदेव भक्तांसह या पालखी पदयात्रेकरुंचे स्वागत करुन पालखीचे पुजन सुद्धा केले. 

गुरुदेव भक्तीत तल्लीन झालेले अन् गुरुदेवाचे नामस्मरण करुन पालखीत आलेले गुरुदेवभक्त अनेक ठिकाणी पालखीचा फेर धरतात. विशेष करुन महिला गुरुदेवभक्तांची संख्या जास्त असते. त्यानुसार आज मोझरी येथे निघालेल्या पालखी पदयात्रेत सुद्धा दिंडीत सहभागी झालेल्या अनेक महिलांनी फुगडीचा फेर धरला. त्यावेळी आमदार यशोमती ठाकूर यांनी सुद्धा या महिला भक्तांसह फुगडीचा फेर धरला.

पालखी शोभायात्रा मोझरी गावातील तुकडोजी महाराजांचा पुतळा असलेल्या मुख्य झेंडा चौकात दाखल होताच, आमदार यशोमती ठाकूर यांनी पालखीचे पुजन करुन अनेक पालखी पदयात्रेकरुंचे स्वागत करुन त्यांच्या डोक्यावर भगव्या टोप्या घातल्या. यावेळी आमदार ॲड.यशोमती ठाकूर यांनी पालखी पदयात्रा ज्या मार्गाने जाणार आहे, त्या मार्गावर संपूर्ण गावात फेरफटका मानला. यावेळी त्यांनी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या ग्रामस्थांची व महिलांशी संवाद साधला. तसेच ज्या ठिकाणी भाविक भक्तांसाठी अल्पोहाराची व्यवस्था करण्यात आली होती, तिथेसुद्धा त्यांनी भेट देवून गुरुदेव भक्तांशी व स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : मनिष जगताप

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा