बारामती, २९ जानेवारी २०२१: इंदापूर तालुक्यातील बोरी गावातील १४२ शेतकऱ्यांनी कृषीपंपाच्या ९६ लाख ७८ हजार रुपयांची थकबाकीचे ५१ लाख रुपये वीजबिल एकरकमी भरुन शासनाने केलेल्या कृषी धोरणाचे स्वागत केले आहे. १४२ शेतकऱ्यांना थकीत विजबिलातून ४५ लाख ७६ हजार रुपयांची सुट मिळाली असून यावेळी महावितरणने शेतकऱ्यांचा सत्कार केला आहे.
बोरी गावात महावितरणचे १०४१ कृषी ग्राहक असुन त्यांच्याकडे ७ कोटी ७१ लाखांची थकबाकी असुन महावितरण बारामती परिमंडलाचे अभियंता सुनील पावडे यांनी बोरी गावात शेतकरी ग्राहकांचा मेळावा आयोजित केला होता.यावेळी दोनशेहून अधिक शेतकरी उपस्थित होते. यावेळी पावडे यांनी शेतकऱ्यांना ‘कृषी धोरण-२०२०’ ची सविस्तर माहिती दिली.
चालू वर्षात सहभाग घेतल्यास दंड, व्याज, निर्लेखित करुन शिल्लक राहणाऱ्या सुधारित थकबाकी पैकी केवळ ५० टक्के रक्कम भरुन उर्वरित १४२ शेतकऱ्यांनी ५१ लाख २ हजार रुपये रक्कम एकाच दिवशी भरली आहे. लवकरच बोरी गावाला शंभर टक्के थकबाकीमुक्त करु असा संकल्प सरपंच संदीप नेवरे, छत्रपती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील व ग्रामस्थांनी केला.
यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील, कार्यकारी अभियंता गणेश लटपटे उपस्थित होते. वालचंदनगर उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता मोहन सूळ, लासुर्णेचे शाखा अभियंता अजयसिंग यादव यांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
न्यूज अनकट प्रतिनिधी:अमोल यादव