शिवसेनेच्या नाव, चिन्हासाठी २००० कोटींचा व्यवहार; संजय राऊत यांचा हल्लाबोल

मुंबई, १९ फेब्रुवारी २०२३ : महाराष्ट्रात शिवसेनेचे नाव आणि चिन्ह हिसकावून घेतल्यानंतर उद्धव गटाचे प्रमुख नेते संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह हिसकावून घेण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचे त्यांनी सांगितले. हे मोठे षडयंत्र असल्याचे संजय राऊत म्हणाले. त्यात एकनाथ शिंदे यशस्वी झाले आहेत; पण त्याचा आनंद फार काळ टिकणार नाही. त्यांचा सर्वोच्च न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे.

उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्यात निवडणूक आयोगाच्या धोरणावर आणि हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आपल्या पक्षाचे शिवसेना नाव आणि बाण आणि धनुष्य हे चिन्ह हिसकावून घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हा कट यशस्वी करण्यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. या घटनेने देशाच्या संविधानाला आणि लोकशाहीला खोलवर दुखापत झाल्याचे ते म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, की महाराष्ट्र अमित शहांना कधीच गांभीर्याने घेत नाही. ते काय बोलतात आणि काय करतात यावर काय बोलावे. सत्य आणि न्याय विकत घेण्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना काय म्हणावे. राऊत यांच्या म्हणण्यानुसार, नाव-चिन्ह प्रकरणात कोण जिंकला आणि कोण हरला हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे.

संजय राऊत म्हणाले, की न्यायालयाने क्लीन चिट दिली, हे सर्वांना माहीत आहे. इस्त्रायली कंपनीला कंत्राट दिले. ते ईव्हीएम मशीन हॅक करून निवडणुका जिंकत आहेत. या गोष्टींवर त्यांनी उत्तर द्यावे, असे ते म्हणाले. आमदार विकत घेण्यासाठी ५०-५० कोटी रुपये घेतात, असे ते म्हणाले. शिवसेना आणि त्यांचे चिन्ह (धनुष्यबाण) हिसकावून घेतले आहे. यासाठी या प्रकरणात आतापर्यंत २००० कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा